swt1912.jpg
11833
वैभववाडी ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत पडलेल्या चांगल्या थंडीमुळे काजूची झाडे मोहोराने बहरू लागली आहेत.
गारठा स्थिरावला; आंबा, काजू बहरला
चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ः पाऱ्याची विक्रमी निच्चांकी नोंद
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही वर्षात केवळ अल्पावधीकरिता पडणाऱ्या थंडीचे वास्तव्य यावर्षी २० ते २५ दिवस राहिले आहे. कोकणातील अधिकृत नोंदणी केंद्रांवर किमान तापमानांची नोंद ७ अंश सेल्शियस ते १० अंश सेल्शियस पर्यत झाली आहे. या थंडीचे सकारात्मक परिणाम आंबा, काजूसह कोकणातील फळपिकांवर दिसू लागले आहेत. त्यामुळे यावर्षी फळपिकांमधून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जागतिक तापमानवाढीचा परिणाम सर्व भूभागावर झाला असला तरी सर्वाधिक झळा अरबी समुद्राशी लगट केलेल्या कोकण प्रातांना बसल्या आहेत. कोकणातील समुद्रकिनारपट्टी ही आंबा, काजु, कोकम, सुपारी, नारळ, जांभुळ, करवंद यासह अन्य फळपिकांसाठी ओळखली जाते. किंबहुना या भागातील वातावरण फळपिकांसाठी पोषक मानले जाते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात लाखो हेक्टरवर फळपिकांची लागवड झाल्याचे दिसून येत आहे. येथील अर्थकारण देखील या पिकांवरच अवलंबून राहिले आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षात बदललेल्या वातावरणाचा परिणाम सर्वाधिक कोकणातील फळपिक उत्पादकांना बसला आहे. बारमाही पडणारा पाऊस, ४० अंश सेल्यिशसपर्यत वाढलेले कमाल तापमान, किमान आणि कमाल तापमानातील तफावत, सतत ढगाळ वातावरण, गारपीट, वादळी वारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायब झालेली थंडी यामुळे कोकणातील फळपिकांना मोठा फटका बसला. आंबा आणि काजू या पिकांवर किडरोग, बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. वातावरणाच्या लहरीपणामुळे जांभुळ, कोकमचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच समाप्त होणे असे प्रकार वाढू लागले.
कोकणातील फळपिक उत्पादकांचे कंबरडेच गेल्या काही वर्षात मोडले. फळपिक उत्पादकांना वातावरण बदलातील विविध घटकांचा सामना करावा लागला असला तरी सर्वाधिक समस्या थंडीची जाणवली. आंब्याला मोहोर फुटण्यासाठी, काजूला पालवी आणि त्यानंतर मोहोर फुटण्यासाठी आणि इतर पिकांना देखील विशिष्ट कालावधीपुरती थंडी आवश्यक असते. परंतु, तिचे वास्तव्यच अगदी तीन चार दिवसांपुरते राहत असल्याने झाडांना अपेक्षित मोहोर, पालवी फुटत नव्हती. मात्र, यावर्षी जिल्ह्यात सुरुवातीला १० नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर आणि आता त्यानंतर २८ नोव्हेंबर नंतर १९ डिसेंबरपर्यंत सिंधुदुर्गातील अधिकृत संशोधन केंद्रांवरील किमान तापमान हे १० अंश सेल्शियस ते १३ किंवा १४ अंश सेल्शियसपर्यत राहिले आहे. याशिवाय दापोलीमध्ये ७ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली आहे. परंतु यापेक्षा आंबोली किंवा अन्य काही भागात तापमान घसरण्याची शक्यता असू शकते. गेल्या काही वर्षात इतके दिवस थंडी वास्तव्यास राहिलेली नाही. या थंडीचे सकारात्मक परिणाम यावर्षी आंबा, काजू पिकांवर दिसू लागले आहेत. उर्वरित पिकांवर देखील परिणाम दिसण्याची हमखास चिन्हे आहेत. लांबलेल्या पावसामुळे आंबा, काजू उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, थंडीने उत्पादकांची चिंता दुर केली आहे. ज्या भागातील आंबा पिकाला मोहोर आला नव्हता, त्या ठिकाणी मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. एरव्ही फुलकिडे, बुरशी, तुडतुड्यांनी ग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. किडरोग, बुरशीचे फवारणी लक्षणीय कमी दिसून येत आहे. त्यामुळे फवारणीवरील खर्च देखील काही कमी होणार आहे. वातावरणातील समतोलपणा कायम राहिल्यास शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनांची यावर्षी अपेक्षा आहे.
कोट
जास्त दिवस थंडी राहिल्यामुळे आंबा, काजू पिकांना चांगला फायदा होणार आहे. सुरुवातीला ज्या झाडांना मोहोर आला नाही, त्या झाडांना मोहोर फुटु लागला आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव देखील काही प्रमाणात कमी होईल. शेतकऱ्यांनी नवीन पालवी किंवा मोहोरांवर लक्ष ठेवून त्यानुसार विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणेच फवारण्या कराव्यात.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र, कुडाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.