rat२०p१.jpg-
२५O११९६५
संगमेश्वर - कडवई मोहल्ला येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून अध्यक्ष (डावीकडून) सिकंदर जुवळे, सादिक काझी व मुस्ताक सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केली.
---
लोकवर्गणीतून कडवई उजळणार सौर पथदीपांनी
ग्रामसभेत निर्णय; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २०:- संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’त सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आणि गावाला स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. गावातील वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी गावातील हजारो पथदीप सौरऊर्जेवर चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे, यासाठी सरकारी निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे लाखोंची लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी आनंद कोकरे व सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी, सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच वसंत उजगावकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या गावबैठकीत गावात सुशासन निर्माण व्हावे आणि गाव समृद्ध व्हावे यासाठी चर्चा करण्यात आली. गावातील सध्या महावितरणच्या १६ वीजमीटरवर पथदीप सुरू आहेत. विजेचे बिल वाचवण्यासाठी हे सर्वच्या सर्व दिवे सौरऊर्जेवर रूपांतरित करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून कडवई बाजारपेठ परिसरातील ४५० पथदीप असलेला मीटर सौरऊर्जेवर करण्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कडवई मोहल्ला येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे तब्बल दोन लाख रुपये तर उजगावकरवाडीतील ग्रामस्थांनी २६ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करून ती अध्यक्ष सिकंदर जुवळे, सादिक काझी व मुस्ताक सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केली.
याच बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर शंभर टक्के भरून ग्रामनिधी बळकट करण्याचा एकमुखी निर्णयही घेण्यात आला. सौरप्रकल्पामुळे गावाची विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना होणारा त्रासही वाचणार आहे. गावची स्वच्छता आणि समृद्धी याला प्राधान्य देऊन या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कडवईकर आता सज्ज झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.