swt2411.jpg
13139
मालवणः येथील समुद्रकिनारी पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यंदाचा पर्यटन हंगाम गजबजणार
२८ पर्यत हॉटेल्स फुल्लः मालवणात वाहतूक कोंडीचे सावट मात्र कायम
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ः सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणची पर्यटन राजधानी सज्ज झाली आहे. नाताळची सुटी आणि ‘इयर एंड’च्या निमित्ताने मालवणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा ओघ वाढला असून २८ डिसेंबरपर्यंत बहुतांश निवास व्यवस्था ‘फुल्ल’ झाल्या आहेत. मुख्य हंगाम असलेल्या २९ डिसेंबर ते १ जानेवारी या काळातील हॉटेल बुकिंग अजूनही सुरु आहेत. मात्र, वाढत्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीचे संकटही गडद झाल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावर्षीच्या पर्यटन हंगामाला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. ऐन दिवाळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, आता पडलेली गुलाबी थंडी आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे पर्यटक मोठ्या संख्येने मालवणात दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत असून याचा स्थानिक छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे. हा ओघ जानेवारी मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्या पर्यटकांच्या गटांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सुखद चित्र दिसत आहे. त्याचबरोबर एकल कुटुंबही छोट्या वाहनांमधून पर्यटनाचा आनंद लुटण्यास दाखल होत आहेत. पर्यटकांची पावले प्रामुख्याने किल्ले सिंधुदुर्ग, राजकोट किल्ला, रॉक गार्डन आणि जयगणेश मंदिराकडे वळत आहेत. तसेच तारकर्ली, देवबाग, चिवला, वायरी आणि आचरा या किनाऱ्यांवर स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि बनाना राईड यांसारख्या साहसी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी ही समस्या कायमच भेडसावत असते. वारंवार यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली जाते. मात्र, याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. शहरात दाखल होणारे पर्यटक हे तारकर्ली, देवबागकडे जात असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. यावेळी यात भर पडली आहे ती तारकर्लीकडे जाणाऱ्या देवली या पर्यायी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तानाजी नाका येथून जाणाऱ्या व वायरी येथील अंतर्गत असलेला रस्ता हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. परिणामी येत्या पाच सहा दिवसाच्या या पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे याचे पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
शहरातील राजकोट किल्ला या नवीन पर्यटन स्थळाची भर पडली आहे. या पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता हा फारच अरुंद असल्याने मेढा भागातही वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार आहे. या दृष्टीने या भागात एकदिशा मार्गाचे नियोजन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल शिवाय पर्यटकांचा वेळही वाचेल. शहरातील प्रमुख रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचेही नियोजन करण्याची गरज आहे.
यंदा २८ आणि २९ डिसेंबरपर्यंत बुकिंग जोरात असले तरी ३१ डिसेंबर रोजी ''सफला एकादशी'' असल्याने ३० आणि ३१ तारखेचे बुकिंग काहीसे मंदावले आहे. तसेच शहरात कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
चौकट
पर्यटकांना मार्गदर्शन करणे गरजेचे
शहरातील प्रमुख नाक्यांवर तैनात असलेल्या पोलीस आणि होमगार्डना स्थानिक भौगोलिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी पर्यटकांना योग्य मार्गाचे मार्गदर्शन केल्यास कोंडी सुटण्यास मदत होईल. तसेच पर्यटकांनी गुगल मॅपवर अवलंबून न राहता स्थानिक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
चौकट
करूळ घाट बंदचा फटका
करूळ घाट रस्ता अद्याप पूर्णपणे सुस्थितीत नसल्याने घाटमाथ्यावरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा थेट परिणाम वैभववाडी आणि तळेरे परिसरातील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. घाटमाथ्यावरील पर्यटक थंडावल्याने त्याचा फटका जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे.
कोट
दिवाळी सुटीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पर्यटन व्यवसायास बसला. मात्र शेवटच्या टप्प्यात शालेय सहली मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या. शिवाय कोरोना महामारी नंतर जवळपास बंदच झालेल्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून गटागटाने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे सुखावह चित्र आहे. हंगामातील आता पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पालिका, पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत वाहतूक कोंडी सह अन्य समस्यांवर नियोजन करणे गरजेचे बनले आहे. महिन्याच्या अखेरीस पर्यटकांचा ओघ काहीसा कमी झाला तरी जानेवारीच्या पंधरावड्यापर्यंत येथील पर्यटन पुन्हा उसळी घेईल असा अंदाज आहे.
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक
कोट
दिवाळी पर्यटन हंगामात पावसामुळे मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. मात्र त्यानंतर नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सध्याचे वातावरण पर्यटनास पोषक असल्याने पर्यटकांचा ओघ शहरासह किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बऱ्यापैकी बुकिंगही झाले आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील हे सहा सात दिवसांचे पर्यटन असले तरी यातून दिवाळीत झालेली तूट भरून काढणे कठीण आहे. मात्र थोड्या प्रमाणात पर्यटन व्यवसायिकांना दिलासा मिळेल असे चित्र आहे. येथील पर्यटनाचा विचार करता जे शंभर दिवसाचे पर्यटन आहे ते दोनशे दिवसाचे कसे होईल. पर्यटकांचे वास्तव्य कसे वाढेल. या दृष्टिकोनातून येत्या काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे तरच पर्यटन व्यवसायिक आर्थिक नुकसानी पासून वाचू शकेल.
- सौगंधराज बांदेकर, पर्यटन व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.