swt256.jpg
13321
भालावल ः ग्रामपंचायत येथे विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर व बक्षीसपात्र ग्रामस्थ.
भालावल येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद
ग्रामपंचायतीचा उपक्रमः विजेत्यांचा सन्मानचिन्ह, पारितोषिकांनी गौरव
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २५ः भालावल ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळा, ग्रामस्थांसाठी विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धांचे आयोजन केले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक तसेच उपक्रमात सहभागी ग्रामस्थांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, बी. आर. सी. गटप्रमुख समिल नाईक, महसूल अधिकारी विजय कविटकर, ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे, आरोग्य सेवक आत्माराम गवस, आरोग्य सेविका तन्वी पाटील, शाळा मुख्याध्यापक नम्रता कोठावळे, मदन मुरकर, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचे स्वागत फुल रोप व गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी राणे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती देत स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. यात पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा, ‘लेक वाचवा लेक वाढवा’, ‘प्लास्टिक बंदीकरिता प्लास्टिक द्या, झाडे घ्या’ तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान अंतर्गत विविध निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान, मुलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर, सुदृढ बालक, कन्यारत्न कुटुंब सन्मान, प्लास्टिक बँक, गांडूळ खत निर्मिती, कचऱ्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याचे नियोजन, शोषखड्डा असे नावीन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्या. यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भालावल ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. या अभियानाबाबत समिल नाईक, महसूल अधिकारी कविटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तृप्ती राणे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर, वृषाली परब, गंधा गावडे, शिक्षक विठ्ठल कुंभार, रुपेश गुंजार, अपूर्वा सावंत आदींसह आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण परब, लक्ष्मण कोकरे, डाटा ऑपरेटर प्रेमा परब उपस्थित होते.