rat25p24.jpg
13465
अंडी घालण्यासाठी आलेले कासव. (संग्रहित फोटो)
---------
ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम - लोगो
सात किनाऱ्यांवर ७२० अंडी संरक्षित
विणीचा हंगाम लांबणार ; डिसेंबर महिन्यात कमी प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरवात झाली असून आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झालेले आहे. त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत. मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवं आली नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची गरज जाणवल्यानंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षामार्फत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव संवर्धनाला मोठ्याप्रमाणात सुरवात झाली आहे. या कासवांच्या अंड्यांची पूर्वी तस्करी केली जात होती. काही ठिकाणी अंडी खाद्य म्हणून वन्यप्राणी वापरत होते. यासाठी त्या-त्या समुद्र किनारी असलेल्या गावातील लोकांचे प्रबोधन करून कासव संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षात ३४ किनाऱ्यांवर कासवांचे संवर्धन केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील पहिले घरटे गुहागर किनाऱ्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदले गेले. तेथील कासवमित्रांनी ती अंडी संरक्षित केली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ किनाऱ्यांवर कासवे अंडी घालून गेली आहेत. मात्र हे प्रमाण यंदा कमी असल्याचा अंदाज कासव अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
यावर्षी पाऊस ऑक्टोबरमध्येही सुरू होता. त्यामुळे समुद्रही खवळलेला होता. अनेकवेळा पाण्याच्या प्रवाहांवर कासवांचे समुद्र किनारी येणे अवलंबून असते. यंदा प्रतिकूल परिस्थीतमुळे कासवांचा कालावधी पुढे सरकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, दहा वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवरील कासवांच्या विणीचा हंगाम हा नोव्हेंबर, डिसेंबर होता. कालांतराने वातावरणातील बदल आणि अन्य कारणांमुळे तो पुढे गेला. गेल्या काही वर्षात डिसेंबरमध्ये विणीच्या हंगामाची सुरवात होत असली तरीही, प्रत्यक्षात मोठ्याप्रमाणात अंडी घालण्यासाठी कासवे येण्याचे प्रमाण जानेवारीच्या पुढेच आहे. त्यामुळे अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीही लांबला आहे.
कोट
जिल्ह्यातील किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येण्यास सुरवात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
- किरण ठाकूर, कांदळवन कक्ष, रत्नागिरी
चौकट
संवर्धनाचे ठिकाण घरटं अंडी
* वेळास १ १२४
* मुरूड १ १०७
* गुहागर २ २४३
* वरवडे १ ९५
* वारे १ ९०
* माडबन १ ९२