-rat२६p२१.jpg-
२५O१३५७१
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप महोत्सवात आर. इ. सोसायटी, महाराजा करंडक पटकावणारे संगीत विभागाचे विद्यार्थी. मागे उभे डॉ. मकरंद साखळकर, डॉ. आनंद आंबेकर आदी.
----
संगीत विभागाने पटकावला महाराजा करंडक
झेप महोत्सव; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप सांस्कृतिक महोत्सवामध्ये सर्वसाधारण विजेतेपदासाठी फिरता आर. इ. सोसायटी करंडक, १९९५च्या बॅचतर्फे महाराजा करंडक आणि १० हजार रुपयांचे पारितोषिक संगीत विभागाने पटकावले. द्वितीय क्रमांक नृत्य विभागाने तर तृतीय क्रमांक उद्योजक विभागाने जिंकला.
संगीत विभागाने चार तासाचा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर केला. एकेरी आणि दुहेरी गाण्याच्या स्पर्धेबरोबर महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षी सुरू झालेल्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक तासाचे कॉन्सर्ट तयार केले होते. त्याला मार्गदर्शन कश्मिरा सावंत यांनी केले. संगीत विभागाचा उत्कृष्ट कार्यक्रम झाल्यामुळे त्याला महाराजा करंडक प्राप्त झाला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी नाट्य, नृत्य, वाङ्मय, संगीत, फाइन आर्ट, फॅशन आणि उद्योजक असे सात विभाग निर्माण करण्यात आले. आवड असलेले विद्यार्थी कार्यक्रम व्यवस्थापन, संयोजनासाठी एकत्र येतात. हे विद्यार्थी महाविद्यालयातील सात विभागांमध्ये सहभाग घ्यावा म्हणून कलाकार विद्यार्थ्यांना आवाहन करतात. यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी करंडक दिला जातो. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये व डॉ. अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक डॉ. आनंद आंबेकर महाराजा ग्रुपचे सदस्य राजेश जाधव, संदेश कीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
---
कोट
विद्यार्थ्यांना कार्यक्रम व्यवस्थापनाचे महत्त्व समजावे आणि हे कौशल्य अवगत करावे म्हणून १९९५च्या महाराजा ग्रुपच्या ११ मित्रांनी २००५ मध्ये महाराजा करंडक प्रायोजित केला. यावर्षी या करंडकला वीस वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रामध्ये असे आयोजन आणि स्पर्धा घेणारे गोगटे महाविद्यालय एकमेव आहे.
- डॉ. आनंद आंबेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख