(फोटो एक कॉलम घ्या)
13654
पराभवानंतरही जनसेवा सुरूच ठेवणार
समीर नलावडे : कणकवलीत जनसंपर्क कार्यालय सुरू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ :‘कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तरी कणकवलीकर जनतेची सेवा यापुढेही सुरू ठेवणार आहे,’ अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. त्यासाठीच जनसंपर्क कार्यालय आजपासून सुरू केल्याचे ते म्हणाले.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘आतापर्यंत केलेली जनतेची प्रामाणिक सेवा यापुढेही या कार्यालयाच्या माध्यमातून करेन. लोकांना माझ्याशी मनमोकळेपणे बोलता यावे, यासाठी हे कार्यालय उघडले आहे. हे कार्यालय पक्षीय नसून वैयक्तिक जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो लावला आहे, तर प्रवेशद्वाराजवळ खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांचे फोटो लावले आहेत.’ ते म्हणाले, ‘माझ्यावर कणकवलीतील पाच हजार मतदारांनी विश्वास टाकला आहे. तर तेवढ्याच मतदारांनी मला मतदान केलेले नाही. मात्र, आपण पूर्वीप्रमाणेच सर्व मतदार, शहरवासीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या कार्यालयात उपलबध असणार आहे. नागरिक आपल्या कामांसाठी नगरपंचायतीमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत येतात. त्यामुळे माझे कार्यालयही त्याच वेळेत खुले राहील.’
विकासाला पाठिंबा, चुकीच्या कामाला विरोध
नलावडे पुढे म्हणाले, ‘कणकवलीकर जनतेने भाजपला बहुमत दिले आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. विकासाला शंभर टक्के पाठिंबा असेल. पालकमंत्री नीतेश राणे यांच्याद्वारे शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेन. मात्र, नगरपंचायतीत चुकीचे काम झाल्यास आमचे सर्व नगरसेवक त्याला कडाडून विरोध करतील. कणकवली शहर विकसित व्हावे, अशी आमची भूमिका आहे.’
-------
मतदारांना बदल हवे असतात!
निवडणुकीतील पराभवाबाबत नलावडे म्हणाले, ‘काही प्रभागांत मला, तर काहींत भाजपच्या उमेदवारांना जास्त मते मिळाली. निवडणुकीत असे घडते. माझ्या पत्नीला त्यांच्या प्रभागात माझ्यापेक्षा जास्त मते मिळाली. कधीकधी मतदारांना बदल हवे असतो. त्यामुळेच काही ठिकाणी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान झाले नसेल.’
--
साडेतेरा कोटींचा निधी; कामे लवकरच!
‘नगरपंचायत आमच्या ताब्यात असताना पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम राबवले जात होते. बंडू हर्णे, बंडू गांगण, अण्णा कोदे यांच्यासह चर्चा करून निर्णय घेत होतो. आता मी नगराध्यक्ष नाही, तरी येत्या काळात उपक्रमांसाठी आम्ही सर्वजण चर्चा करून निर्णय घेऊ. साडेतेरा कोटींचा निधी मिळाला होता, त्यातील कामे लवकर सुरू होतील,’ असेही त्यांनी सांगितले.
---
...तरीही आम्हालाच बहुमत!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढलो. माझा पराभव झाला तरी आमचे ९ नगरसेवक विजयी झाले. कणकवलीकरांनी आम्हाला बहुमत दिले आहे. काही नियोजन चुकले, त्यामुळे पराभव झाला. मात्र, हार-जीत पचवण्याची ताकद नारायण राणे यांनी दिली आहे. पराभवाला न घाबरता जनतेची सेवा करत राहणार, असे नलावडे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.