14027
पाटील यांना ‘काणेकर’ पुरस्कार प्रदान
बांदा ः कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा जिल्हास्तरीय (कै.) सौ. उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार यावर्षी मोरगाव (ता.दोडामार्ग) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका स्वाती पाटील यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, कणकवली हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, संपादक व प्रसारक प्रकाश केसरकर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्यवाह प्रशांत काणेकर तसेच साहित्यिका कल्पना मलये उपस्थित होते. पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले शैक्षणिक, सांस्कृतिक व उपक्रमशील कार्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमात कला, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. पाटील यांनी, आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे मत व्यक्त केले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.
---
14047
केसरकरांकडून नगरसेवकांचा सत्कार
सावंतवाडी ः माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीधर अपार्टमेंट येथे हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे,नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर उपस्थित होत्या. यावेळी दत्ता सावंत, संजय पेडणेकर, दिपाली सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---
14000
सुशिला जोशी यांना पुरस्कार जाहीर
तळेरे ः शिक्षण व बालसंस्कार क्षेत्रात अनेक दशके मोलाचे योगदान देणाऱ्या देवगड येथील ज्येष्ठ शिक्षणसेविका श्रीमती सुशीला दिनकर जोशी यांना शिक्षक भारती, सिंधुदुर्गच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीमती जोशी यांनी देवगड कन्या शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. देवगड तालुक्यात लहान मुलांच्या शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसताना, ग्रामस्थांच्या विनंतीवरून त्यांनी १९६६ च्या सुमारास बालसंस्कार केंद्राची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून देवगड परिसरात शैक्षणिक चळवळीची भक्कम मुहूर्तमेढ रोवली गेली. डॉ. सुनील आठवले, अॅड. शामसुंदर जोशी, प्रसिद्ध व्यापारी प्रमोद नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत. त्यांच्या शिक्षण, संस्कार आणि समाजघडणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार ३ जानेवारीला होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव समीर परब आणि महिला आघाडी अध्यक्षा सुष्मिता चव्हाण यांनी दिली आहे.
------
‘स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावा’
पावस ः भारताच्या प्रगतीमध्ये तरुण पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वयंशिस्त, मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारावा. अपयशाने खचून न जाता स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावण्याचा संदेश इंडियन कोस्ट गार्डचे कमांडंट अमित ध्यानी यांनी विद्यार्थ्यांना दिला. रत्नागिरी येथील नवनिर्माण हाय स्कूल आयोजित ‘सांस्कृतिक २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही, वातावरणात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. महत्त्वाच्या राष्ट्रीय व सामाजिक घटनांचे प्रभावी कलात्मक सादरीकरण हे या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इंडियन कोस्ट गार्डचे कमांडंट अमित ध्यानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक उल्हास सप्रे, पक्षी निरीक्षक तेजा मुळे, लेखिका शर्मिला पटवर्धन उपस्थित होते. चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी इस्रोच्या सहकार्याने ‘स्पेस लॅब’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----
अस्मि साळुंखेला सुवर्णासह चार पदके
पावस ः राज्यातील अव्वल सब ज्युनिअर खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अस्मि तुषार साळुंखे हिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कास्य अशी चार पदके जिंकून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कुडाळ येथे झाली. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या चुरशीच्या स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेणारी व पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेली अस्मि साळुंखे हिने तायक्वांदो फाईट प्रकारात रौप्यपदक, फ्री स्टाईल सिंगल प्रकारात सुवर्ण पदक, पुमसे ग्रुप प्रकारात रौप्यपदक आणि आणखी एका प्रकारात कास्यपदक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली. शशीरेखा कररा यांनी तिला मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.