rat28p18.jpg
14016
दापोलीः मुरुड येथील वॉटर स्पोर्टसला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
rat28p19.jpg
14017
मुरुड येथील बीचवर सुट्टीमुळे पर्यटकांनी गर्दी केली आहे.
rat28p20.jpg
14018
दापोलीः हर्णै बाजारपेठेत झालेली वाहतूक कोंडी.
----------
दापोलीत पर्यटनाला सुगीचे दिवस
नाताळनिमित्त अन् नववर्षाच्या स्वागतासाठी किनारे गजबजले; रिसॉर्ट, होम स्टे फुल्ल
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २८ः थंड, आल्हाददायक वातावरण, नववर्षाच्या स्वागताची उत्सुकता आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे दापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दापोलीसह तालुक्यातील प्रमुख समुद्रकिनारे, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे पर्यटकांनी फुलून गेली असून हॉटेल, रिसॉर्ट व निवास व्यवस्था जवळपास हाऊसफुल्ल झाली आहेत.
दापोली शहरापासून अवघ्या सात ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले मुरुड, कर्दे व लाडघर हे समुद्रकिनारे पर्यटनाच्या जागतिक नकाशावर दापोलीला वेगळे स्थान देतात. नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने तालुक्यातील बहुतांश हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आधीच भरले असून काही ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत बुकिंग फुल्ल झाली आहेत. त्यामुळे यंदा हा पर्यटन हंगाम ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरेल असा अंदाज पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.
मुरुड, कर्दे, लाडघर, आंजर्ले, दाभोळ, पाळंदे, हर्णै, केळशी हे किनारे नाताळच्या सुट्टीत पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. स्वच्छ पांढरी वाळू, फेसाळणाऱ्या समुद्रलाटा, रात्रीचा मंद गार वारा आणि गुलाबी थंडी यामुळे पर्यटक विशेष आकर्षित होत आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे, मुंबईसह सांगली, सातारा, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक दापोलीकडे येत असल्याचे चित्र आहे.
समुद्रकिनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स हा पर्यटकांचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाळंदे व मुरुड येथे वॉटर गेम्स, सँड बाईक, पॅरासेलिंग, उंट व घोडागाडी सफर, सकाळच्या वेळेतील डॉल्फिन दर्शन यामुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरासह समुद्रकिनारी असलेल्या सुमारे तीन हजारांहून अधिक निवास योजना या काळात पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत.
या हंगामात अंदाजे एक लाखांहून अधिक पर्यटकांनी तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट दिल्याचे चित्र आहे.
चौकट
ही ठिकाणे पसंतीस
आंजर्लेतील कड्यावरचा गणपती, केशवराज मंदिर, केळशी येथील याकूब बाबा दर्गा, मुरुडचे दुर्गादेवी मंदिर, दाभोळचे चंडिका देवी मंदिर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, हर्णै येथील सुवर्णदुर्ग व कनकदुर्ग, वणंद येथील रमाबाई आंबेडकर स्मारक, पालगड येथील साने गुरुजी स्मारक, कोकण कृषी विद्यापीठ, बुरोंडीजवळील परशुराम पुतळा ही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत.
चौकट
किनाऱ्यावर पोलिस बंदोबस्त
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर लाइफगार्ड, लाईफजॅकेट व्यवस्था व चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नाताळ व नववर्ष शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थ व जीव रक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोट
यंदा नववर्ष स्वागतासाठी अन् नाताळच्या सुट्ट्यांमुळे दापोली तालुक्यात पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे तसेच वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय जवळपास पूर्ण क्षमतेने चालू आहेत. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळत असून गावच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. मात्र वाढत्या पर्यटक संख्येच्या तुलनेत रस्ते, पार्किंग, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शासनाने कायमस्वरूपी सुविधा उभ्या केल्यास दापोलीचा पर्यटन व्यवसाय आणखी उंची गाठेल.
- सचिन तोडणकर, सरपंच, कर्दे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.