14183
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू
तहसीलदार पाटील ः कुडाळात ‘पेन्शनर्स डे’ निमित्त मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः ज्येष्ठ नागरिकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे, असे प्रतिपादन येथील तहसीलदार सचिन पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात केले.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन सरन्यायाधिश (कै.) यशवंतराव चंद्रचुड वगैरे पाच यांच्या खंडपिठाने पेन्शन हा पेन्शनरांचा हक्क आहे, असा १७ डिसेंबर १९८२ ला ऐतिहासिक निर्णय दिला होता. तेव्हापासून देशातील सर्व पेन्शनर्स संघटना १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा करतात. याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद निवृत्तांचा मेळावा येथील मराठा हॉलमध्ये आयोजित केला होता. याचे उद्घाटन तहसीलदार पाटील यांच्या हस्ते जिल्हा कोषागार अधिकारी संजय घोगळे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, सिंधुदुर्ग पेन्शनर्स असोसिएशन, कुडाळचे कार्याध्यक्ष शरद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी असोसिएशनचे सुरेश पेडणेकर, मनोहर सळमळकर, चंद्रकांत अणावकर, रमेश पिंगुळकर, सुभाष गोवेकर, प्रकाश सावंत, आर. आर. दळवी, उदय कुडाळकर, लक्ष्मीकांत पंडित, अजित गवंडे, चंद्रकांत पाताडे, दिलीप धालवलकर, मीनाक्षी नार्वेकर, वसंत तेली आदी उपस्थित होते.
तहसीलदार पाटील म्हणाले, ‘आजचे संगणक युग आहे. मात्र, तुमच्या कालावधीत अतिशय खडतर कालावधी असताना तुम्ही एक सेवक म्हणून शासनाची सेवा केली, हे निश्चित आम्हाला प्रेरणादायी आहे. निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांचे काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहे. ज्येष्ठांसाठी शासन सुविधा खूप आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. भविष्यात तुमचे जे काय प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल.’
श्री. घोगळे यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडताना शासनाच्या विविध योजना त्यांनी सांगितल्या. वेळीच पेन्शन मिळाली पाहिजे, असे सांगत मार्गदर्शन केले. असोसिएशनचे ज्येष्ठ नेते सुरेश पेडणेकर यांनी ज्येष्ठांचे अनेक प्रश्न शासन दरबारी आहेत. शासन त्याची दखल घेत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागते. भविष्यात न्याय्य हक्कासाठी, लढा कायम ठेवण्यासाठी संघटितपणा महत्त्वाचा आहे, असे सांगितले. मनोहर सरमळकर यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. दळवी यांनी आभार मानले.
----------------
२६ जानेवारीला आंदोलन ः अणावकर
शासन दरबारी गेली अनेक वर्षे ज्येष्ठांवर सातत्याने अन्याय होत आहे. विविध प्रश्न मार्गी लागत नाहीत. आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वज वंदनानंतर येथील पंचायत समितीसमोर नव्हे तर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर धडक आंदोलन मोहीम राबवण्यात येईल, असा इशारा श्री. अणावकर यांनी यावेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.