हेवाळेत गुरुवारी
धार्मिक कार्यक्रम
दोडामार्ग : अयोध्या येथे झालेल्या राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हेवाळे येथील पांडवकालीन पंचायतन श्रीराम मंदिरात गुरुवारी (ता. १) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी श्रीराम-सीता पंचायतन देवतांची पूजा व अभिषेक, त्यानंतर श्रीराम नामजप, महामंत्र जप, आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद, सायंकाळी रामभक्तांचे भजन, रात्री श्री सातेरी माऊली वारकरी मंडळ, हलदोणे (बार्देश-गोवा) यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ, पिकुळे लाडाचेटेंब यांचा ''नाग-भस्म तिलक'' हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. हा कार्यक्रम हेवाळे ग्रामस्थ व श्री सातेरी मायदेव युवा मंडळ, हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. सर्व रामभक्त व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---
मळगाव येथे उद्या
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडी ः मळगाव येथील भिल्लवाडी ग्रुप आणि विश्वकला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा सोहळा बुधवारी (ता. ३१) मळगाव येथील आझाद मैदान येथे होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेसातला होणार असून रात्री बारापर्यंत विविध कलाप्रकार सादर केले जातील. संगीत, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी गावातील सर्व नागरिकांना, रसिक प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासह आणि मित्रपरिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
....................
बांद्यात रविवारी
‘आनंद मेळावा’
आरोंदा ः सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा सावंतवाडीचा आनंद मेळावा चार जानेवारीला संतोषी माता मंगल कार्यालय, बांदा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या आनंद मेळाव्यासाठी सहभोजन व कार्यक्रम नियोजन अरुण मोर्ये व सहकारी (बांदा विभाग) यांनी केले आहे. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दत्ताराम फटनाईक (अध्यक्ष) व कार्यकारिणी सभासद यांच्यावतीने करण्यात आले आहे.
.....................
नेमळे विद्यालयात
आज स्नेहसंमेलन
सावंतवाडी ः नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या (ता. ३०) सायंकाळी ६ वाजता विद्यालयाच्या बालाजी रंगमंचावर होणार आहे. संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण म्हणजे राजेश गुडेकर दिग्दर्शित मुलींचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘ब्रम्हतेज’ व उमेश राऊळ लिखित दिग्दर्शित ‘बाप’ नाटिका तसेच श्रीम. कोंडये व श्रीम. बरागडे दिग्दर्शित ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ नाटिका, भारूड, पोवाडा, देशभक्तिपर नृत्य, लावणी, ओवी, शंभू वंदना असे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य आर. के. राठोड यांनी केले आहे.
......................
सातार्डा प्रशालेचे
आज स्नेहसंमेलन
आरोंदा ः सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित, महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उद्या (ता. ३०) सायंकाळी सहाला आयोजित केला आहे. हा कार्यक्रम संदीप परब (संस्थापक, जीवन आनंद संस्था, कुडाळ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योजक दत्ता कवठणकर तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक शिवानंद राऊळ, सातार्डा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर, रवींद्र धाकोरकर, माजी शिक्षक नामदेव साटेलकर उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.