Rat30p24.jpg
14411
मंडणगड: पत्रकार परिषदेत माहिती देताना अजातशत्रू नाटकाचे दिग्दर्शक योगेश दळवी, सोबत डावीकडून राजेश मर्चंडे, वाल्मिक परहर, दगडू जगताप व अन्य मान्यवर.
अजातशत्रू नाट्यप्रयोगाने नाट्यसंस्कृतीला संजीवनी
मंडणगडमध्ये प्रथमच सादरीकरण; स्थानिक कलाकारांच्या चळवळीला बळ, ९ जानेवारीला प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.३० ः तालुक्यात काही वर्षांपासून खंडित झालेल्या नाट्य अभिनय चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळावी तसेच मोबाईल रिल्स व स्टेटसच्या मोहजाळात अडकलेल्या युवापिढीला जिवंत कलांच्या सादरीकरणाकडे वळवावे, या उद्देशाने मंडणगडमध्ये प्रथमच व्यावसायिक दर्जाच्या अजातशत्रू या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील मूळचे दहागाव येथील लेखक, दिग्दर्शक व नाट्यकर्मी योगेश दळवी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारत आहे.
मुंबईत सध्या स्थायिक असलेले दळवी हे हौशी नाट्यचळवळीशी सातत्याने जोडलेले आहेत. मंडणगड तालुक्यातील नाट्यप्रेमी व्हॉट्सअॅप मंडळ, माजी नगरसेवक राजेश मर्चंडे आणि शिक्षक दिलीप मराठे यांच्या सहकार्याने हा नाट्यप्रयोग ९ जानेवारी रोजी लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या मैदानावर सादर होणार आहे. बाळासाहेब थोरात लिखित व योगेश दळवी दिग्दर्शित अजातशत्रू या नाटकात सम्राट अजातशत्रू आणि आध्यात्मिक क्षेत्रातील देवदत्त या दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांचा सत्तेच्या व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेच्या पार्श्वभूमीवरचा प्रवास उलगडण्यात आला आहे. ध्येयप्राप्तीनंतर अजातशत्रूच्या व्यक्तिमत्त्वात शांतीच्या मार्गाने होणारे परिवर्तन ही या नाटकाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचे दळवी यांनी सांगितले. सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडातील राज्यव्यवस्था, प्रशासन, सामाजिक जीवन, भाषा व जीवनपद्धती यांचे प्रभावी चित्रण करत वेगाने घडणाऱ्या घटनांमुळे नाटकातील अभिनय अत्यंत आव्हानात्मक ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, प्रभारी प्राचार्य वाल्मिक परहर, ग्रंथपाल दगडू जगताप, अनंत नलावडे आदी उपस्थित होते. आयोजकांनी तालुक्यातील कलारसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक कलाकारांच्या नाट्यकृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
चौकट
३२ कलाकारांचा सहभाग
नाट्यप्रयोगात रंगमंचावर १६ आणि पडद्यामागे १६ असे एकूण ३२ कलाकार कार्यरत आहेत. मंडणगड तालुक्यात नाटक ही कला कायमस्वरूपी रूजवण्यासाठी येत्या काळात विविध उपक्रम स्थानिकांच्या सहकार्याने राबवण्यात येणार असल्याचेही दळवी यांनी सांगितले.