rat31p12.jpg-
14653
राजापूरः ‘ब्रीज सेफ्टी नेट’ मॉडेल.
-----------
पुलावरून खाली न पाडणारे ब्रीज सेफ्टी नेट
सृष्टी कांबळे, श्रावणी सावंतचे तयार केले उपकरण ; राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः अनेक भागांमध्ये नद्या वा समुद्राच्या पाण्यामध्ये पुलाची उभारणी तर, काही ठिकाणी दोन डोंगरांना जोडणारा पूल उभारून रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, काहीवेळा पुलावरून गाड्या कोसळल्याने अनेक निष्पापांना जीव गमवावा लागतो. काहीवेळा मानसिक निराशेमुळे पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचेही प्रकार घडतात. अशावेळी व्यक्ती जमिनीवर वा पाण्यामध्ये पडण्यापूर्वी सुरक्षितरीत्या अधांतरी राहू शकेल असे अनेक निष्पापांचे जीव वाचविणारे ‘ब्रीज सेफ्टी नेट’ नामक उपकरण सृष्टी कांबळे आणि श्रावणी सावंत या विद्यार्थिनींनी तयार केले आहे.
कोंड्ये येथील अमल विद्यावर्धिनी संचलित निर्मला भिडे विद्यालयातील या विद्यार्थिनी आहेत. ‘विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी विविध मार्ग’ या संकल्पनेतून हे विज्ञान मॉडेल तयार करण्यासाठी सृष्टी आणि श्रावणी यांना विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे आणि मुख्याध्यापक अरुण कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले. संगमेश्वर येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये या अनोख्या मॉडेलने सार्यांचे लक्ष वेधत द्वितीय क्रमांक पटकावला. या मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
चौकटः
‘ब्रीज सेफ्टी नेट’ असे ठरते उपयुक्त
‘ब्रीज सेफ्टी नेट’ या मॉडेलमध्ये मेटॉलच्या मजबूत जाळीचा उपयोग करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना पुलाच्या कठड्यापासून सुमारे पाच ते सहा फूट अंतर ठेवून लोखंडी फ्रेम बसवून त्यावर ही जाळी बसविण्यात आली आहे. पुलाच्या कठड्यावरून एखादी गाडी पलटी झाल्यास ती अपघातग्रस्त गाडी पुलाच्या कठड्यापासून सुमारे पाच ते सहा फुटाच्या बाहेरून खाली पडत नाही. अशा स्थितीमध्ये एखाद्या पुलावरून गाडी पलटी झाल्यास ही गाडी कठड्यापासून पाच-सहा फूट अंतरामध्ये बसविण्यात आलेल्या मेटॉलच्या जाळ्यामध्ये अडकते. त्यामुळे होणारे नुकसान आणि मनुष्यहानी टाळणे शक्य होत असल्याची माहिती विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.