rat31p17.jpg-
14661
संगमेश्वर ः कुंडी येथे आढळलेले सह्याद्री राजस फुलपाखरू.
-------------
कुंडीच्या देवराईत गवसले ‘सह्याद्री राजस’
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच नोंद; संशोधक प्रतीक मोरे, विराज आठल्ये यांचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ः वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असलेल्या आणि अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘सह्याद्री राजस’ या फुलपाखराची रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील या फुलपाखराची ही पहिलीच छायाचित्रित नोंद ठरली असून, यामुळे निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे संशोधक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांनी २२ डिसेंबरला संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील श्री केदारलिंग देवराईमध्ये या फुलपाखराचे निरीक्षण केले आणि त्याचे छायाचित्र टिपले. कुंडी हे गाव देवरूखपासून सुमारे १५ किमी अंतरावर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या भागात असलेल्या घनदाट देवराईमुळे येथील निसर्गसंपदा आजही टिकून आहे. यापूर्वी या प्रजातीचा अधिवास प्रामुख्याने दक्षिण पश्चिम घाटात असल्याचे मानले जात होते. त्यानंतर आंबोली आणि ताम्हिणी (पुणे) परिसरातून याच्या नोंदी झाल्या होत्या, मात्र पुराव्यासाठी आवश्यक असलेले छायाचित्र उपलब्ध नव्हते.
कुंडी परिसरात संशोधकांनी जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात सर्वेक्षण केले होते, ज्यामध्ये ९५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली होती. आता सह्याद्री राजसच्या या नव्या छायाचित्रित नोंदीमुळे कुंडी आणि परिसरातील जैवविविधतेचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले आहे.
चौकट
*काय आहे ‘सह्याद्री राजस’चे वैशिष्ट्य?
- प्रदेशनिष्ठ प्रजात: हे फुलपाखरू ''राजस'' या प्रजातीची उपप्रजात असून ते प्रामुख्याने सह्याद्रीच्या रांगांमध्येच आढळते.
- स्वरूप: याच्या पंखांचा विस्तार साधारणपणे ३० ते ४० मिमी असतो. याच्या पंखांवर आकर्षक चांदी-निळ्या रंगाच्या खुणा असतात, ज्यामुळे ते अतिशय देखणे दिसते.
- संरक्षण: हे फुलपाखरू वन्यजीव संरक्षण कायद्याच्या द्वितीय श्रेणीत समाविष्ट असून याला विशेष कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.
-------
कोट
कुंडी गावातील केदारलिंग देवराईचे जतन ग्रामस्थांनी उत्तम प्रकारे केल्यामुळेच अशा दुर्मिळ प्रजाती तिथे पाहायला मिळत आहेत. ही नोंद महाराष्ट्राच्या फुलपाखरू अभ्यासामध्ये मैलाचा दगड ठरेल.
- प्रतीक मोरे, सह्याद्री संकल्प सोसायटी