14670
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन
कुडाळातील रोटरी क्लब महोत्सव; ‘रंगी रंगला महाराष्ट्र’मध्ये रसिक मंत्रमुग्ध
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः येथील रोटरी क्लब कुडाळच्या महोत्सवात साई कला मंच निर्मित महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ या नृत्य, गायन सोहळा उत्साहात पार पडला.
नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येथील हायस्कूलच्या मैदानावर येथील रोटरी क्लबतर्फे फूड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. गेले दोन दिवस हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच विविध नृत्य, गायन, फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा रसिकांच्या उपस्थितीत पार पडल्या. काल (ता.३०) रात्री साई कला मंचनिर्मित साईनाथ इंटरटेनमेंट प्रकाशित नागेश नेमळेकर निर्मित आणि सूत्रधार भूषण तेजम संचलित ६५ कलावतांचा संच असणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक लोककलेची ओळख नृत्य, गायन या विविधांगीतून साकारणारा ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ कार्यक्रम येथे पार पडला.
सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. अनेक कला जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातही अनेक कलांचा या ठिकाणी प्रत्यय दिसून येतो. महाराष्ट्रात विविध लोककलांचा अभ्यास करून साईकला मंचने हा कार्यक्रम साजरा केला. आपल्या कोकणात वासुदेव महत्त्वाचा मानला जातो. पहाटेच्या पहरी येणारा वासुदेव यांच्या आगमनाने साई कला मंचाने कार्यक्रमाची सुरुवात केली. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्याची ओळख शेतकरी नृत्यातून दाखवण्यात आली. डोंगरदऱ्यात राहणारा ठाकर आदिवासी समाज आणि या समाजाचे चित्र ‘आम्ही ठाकर, ठाकर’ या गीतातून दाखवण्यात आले. धनगर समाजाच्या लोकनृत्यासह दर्याचे राजे अर्थात कोळी नृत्य सादर करण्यात आले. वादक सचिन कुडतरकर युवराज कुर्ले, अश्विन जाधव, वीरेश वळंजू, ओंकार कासकर, गायक सतीश माडये, सिद्धेश मोंडकर, हर्षद मेस्त्री, डॉ. निशा धुरी यांची साथ मिळाली. कार्यक्रमाची महाराष्ट्र गीताने सुरुवात तर भैरवीने सांगता झाली. निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले.
---
लग्न सोहळा ठरला लक्ष्यवेधी
कोकणातील प्रसिद्ध गणेशोत्सव सणानिमित्त श्री गणेशाच्या विविध नृत्यांसह चिपळूणचे ‘बाल्या नृत्य’, रत्नागिरीचे ‘नमन’ही यावेळी दाखविण्यात आले. कोकणची दशावतार लोककला आणि त्या लोककलेतील सादरीकरण तसेच लक्ष्यवेधी ठरलेला लग्न सोहळा सुद्धा सुंदररित्या दाखवण्यात आला.
--
पारंपरिक नृत्यांनी रंगत
एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलांचा समावेश असलेला वासुदेव, भूपाळी, शेतकरी, कोळी, धनगर, ठाकर, पारंपरिक लग्नसोहळा, बाला नृत्य, नमन, फुगडी, शिवराज्याभिषेक, गोंधळ, लावणी, दहीहंडी, भारूड कोकणतला दशवतार व शिमगा यांसारख्या पारंपरिक नृत्यांनी बहरलेला संगीतमय कलाविष्कार लक्षवेधी ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.