14933
14914
14919
सिंधुदुर्गात पर्यटनाचा ‘ट्रेंड’ बदलतोय
फार्मस्टे, होमस्टेकडे कलः शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिकरित्या समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि हंगामी पर्यटनासाठी ओळखला जातो; मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात पर्यटनाची दिशा बदलताना स्पष्टपणे दिसत आहे. मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि गर्दीवर आधारित पर्यटनाऐवजी फार्मस्टे-होमस्टेकडे पर्यटकांचा कल वाढताना दिसत आहे. इंडियन रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड २०२६ साठी (आयआरटीसीएस) जाहीर झालेल्या शॉर्ट लिस्टसाठी जिल्ह्यातील तीन पर्यटन उपक्रमांची निवड होणे, हा बदल केवळ संकल्पनात्मक नसून तो आकड्यांतून सिद्ध होणारा वास्तव बदल असल्याचे दर्शवितो.
सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्हा सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्यामुळे तो पर्यटनासाठी एक प्रमुख ठिकाण बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला, शांत आणि सुंदर किनारे, आंबोली घाट, नयनरम्य निसर्ग, दशावतार, चित्रकथी यांसारख्या लोककला, वॉटर स्पोर्ट्स, मासेमारी आणि स्थानिक कला यामुळे पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांना अधिक भावतो, परंतु शेजारील पर्यटन राज्य असलेल्या गोवा राज्यातील प्रभाव या जिल्ह्यात पर्यटन विकास होताना वाढताना दिसत आहे. पाश्चात्य संस्कृती वाढताना दिसत आहे.
जिल्ह्याचे सौंदर्य जपत, निसर्गाला बाधा येणार नाही तसेच कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, अशा प्रकारे येथील पर्यटन विकास झाला पाहिजे. येथील पर्यटन विकासात स्थानिकांचा मोठा सहभाग पाहिजे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिक कलाकारांच्या कलेचा सन्मान झाला पाहिजे. शेतकरी, बागायतदार, छोटेमोठे व्यावसायिक यांनी उत्पादित केलेल्या मालाला मूल्य मिळाले पाहिजे, असा आग्रह जिल्ह्यातील नागरिकांचा आहे. त्यातच इंडियन रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड २०२६ (आयआरटीसीएस) साठी जाहीर झालेल्या शॉर्ट लिस्टसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शाश्वत नेतृत्व-फार्मस्टे’ मध्ये बागायतदार फार्मस्टे याची आणि ‘शाश्वत नेतृत्व–होमस्टे’ यासाठी कोकणाई अॅग्रो टुरिझम आणि सुंदर आर्ट होमस्टे या तीन पर्यटन उपक्रमांची शासनाने निवड केल्याने नागरिकांच्या या मागणीला बळ मिळाले आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील युवकांसाठी कृषिपूरक पर्यटन, होमस्टे आणि फार्मस्टे या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिक पर्यटनाची जोड देत स्वतःच्या गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो, हे या उपक्रमांनी सिद्ध केले आहे.
*ट्रेंड बदलतोय
मोठमोठी हॉटेल झाली की जास्त खर्च करणारे पर्यटक आकर्षित होतील, असा सर्वसाधारण समज असतो. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशी हॉटेलही वाढली. मात्र, गेल्या दहा वर्षांत हा ट्रेंड बदलताना दिसत आहे. होमस्टे, फार्म हाऊस, फार्मस्टे याला पसंती मिळू लागली आहे. यामुळे पर्यटन ग्रामीण भागापर्यंत पसरत आहे. पूर्वी जिल्ह्यातील पारंपरिक पर्यटन प्रामुख्याने ३ ते ४ महिन्यांपुरते मर्यादित असते. या कालावधीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते; मात्र उर्वरित काळात पर्यटन व्यवसाय जवळपास ठप्प होतो. याउलट फार्मस्टे–होमस्टे मॉडेलमुळे पर्यटनाचा कालावधी ८ ते ९ महिन्यांपर्यंत वाढलेला दिसतो. गर्दी नियंत्रित राहते आणि ऑफ सीझनमध्येही स्थानिकांना सातत्यपूर्ण रोजगार उपलब्ध होतो. परिणामी, सिंधुदुर्गातील पर्यटन ''हंगामी'' न राहता वर्षभर चालणारे बनत आहे.
* पैसा कुठे फिरतो ?
पर्यटक डेटा पाहिला असता परंपरागत पर्यटनामध्ये निर्माण होणाऱ्या उत्पन्नापैकी केवळ २० ते ३० टक्के पैसा स्थानिक अर्थव्यवस्थेत राहतो, तर उर्वरित मोठा हिस्सा जिल्ह्याबाहेर जातो. फार्मस्टे-होमस्टे मॉडेलमध्ये मात्र ६० ते ७० टक्के उत्पन्न थेट गावपातळीवर खर्च होते. स्थानिक शेतमाल, हस्तकला, मासळी, दुग्धजन्य पदार्थ आणि स्थानिक सेवा यांना थेट मागणी निर्माण होते. त्यामुळे पर्यटनातून येणारा पैसा गावातच फिरत राहून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. जिल्ह्याच्या परंपरागत पर्यटनात रोजगार मुख्यतः हंगामी स्वरुपाचा असतो. एका पर्यटन उपक्रमातून सरासरी ५ ते ८ लोकांना थेट काम मिळते. याउलट शाश्वत पर्यटनात एका फार्मस्टे–होमस्टेमुळे २५ ते ३० लोकांपर्यंत रोजगारनिर्मिती होते. यात महिला बचतगट, स्थानिक युवक, शेतकरी, कारागीर यांचा सहभाग लक्षणीय आहे. विशेषतः महिलांचा सहभाग वाढल्याने कुटुंबीयांचे उत्पन्न आणि सामाजिक स्थान दोन्ही मजबूत होत आहे.
..................
* ताण की समतोल ?
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पारंपरिक पर्यटनामुळे पाण्याचा अतिवापर, कचरा निर्मिती आणि कार्बन फूटप्रिंट वाढतो. याउलट फार्मस्टे–होमस्टे मॉडेलमध्ये पाणी वापर नियंत्रित राहतो, कचरा कमी निर्माण होतो आणि कार्बन फूटप्रिंटमध्ये ४० ते ६० टक्के घट दिसून येते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हे मॉडेल अधिक पर्यावरणपूरक आणि सुरक्षित ठरत आहे.
परंपरागत पर्यटनात स्थानिकांचा सहभाग मर्यादित राहतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटनाविषयी असंतोषही दिसून येतो. मात्र, शाश्वत पर्यटनात गावकरी थेट पर्यटनाचे भागीदार बनतात. ''आपलेपणा''ची भावना वाढते, ज्यामुळे पर्यटनविरोधातील ताण कमी होतो आणि सामाजिक समतोल निर्माण होतो.
...............
* चित्र बदलतेय...
या नव्या पर्यटन मॉडेलमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवक स्थलांतरात १० ते १५ टक्के घट, शेतीपूरक उत्पन्नात वाढ आणि स्थानिक उत्पादनांसाठी नव्या बाजारपेठा निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्याची पर्यटन ओळख आता केवळ समुद्र किनारे न राहता संस्कृती, कृषी आणि निसर्ग अशी व्यापक होत आहे. आयआरटीसीएस २०२६ साठी निवड झालेले बागायतदार फार्मस्टे, कोकणाई अॅग्रो टुरिझम आणि सुंदर आर्ट होमस्टे हे उपक्रम सिंधुदुर्गच्या भविष्यातील पर्यटन दिशेचे निर्देशक ठरत आहेत. या निवडीमुळे जिल्ह्याची ओळख ‘शाश्वत सिंधुदुर्ग किंवा टिकाऊ सिंधुदुर्ग’ अशी होण्यास मदत होत आहे. नैसर्गिक संसाधने, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती भविष्यातील पिढ्यांसाठीही टिकून राहतील, ज्यात निसर्गाला हानी न पोहोचवता पर्यटन, शेती आणि इतर उद्योगांचा विकास साधण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे हे प्रमाणित होत आहे, ज्यातून येथील पारंपरिक जीवनशैली आणि संस्कृतीचे संवर्धन करत पाणी, जंगल आणि इतर नैसर्गिक संपत्तीचा जपून वापर करत पर्यावरणास अनुकूल, सामाजिकदृष्ट्या न्यायसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, असा जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू झाल्याचे म्हणायला हरकत नाही; अन्यथा बाजूच्या गोव्याची ‘कमर्शियल टुरिझम’मुळे झालेली वाताहत नैसर्गिक आणि सांस्कृतिक नुकसान आम्ही जवळून बघितले होते. पर्यटन म्हणजे केवळ मजा मारणे, पार्ट्या करणे, हे नाही.
...................
कोट
इंडियन रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड २०२६ (आयआरटीसीएस) साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार फार्मस्टे, कोकणाई अॅग्रो टुरिझम व सुंदर आर्ट होमस्टे या उपक्रमांची शॉर्टलिस्टमध्ये निवड होणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत, पर्यावरणपूरक आणि स्थानिक सहभागावर आधारित पर्यटन विकासाची दिशा अधिक भक्कम झाली आहे.
- डॉ. दीपक माने, प्रादेशिक पर्यटन विकास अधिकारी
......................
कोट
राज्याच्या पर्यटन धोरणानुसार स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे, कृषिपूरक पर्यटनास चालना देणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन राखून पर्यटन विकास साधणे, हे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची बदलत असलेली दिशा या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीचे द्योतक आहे.
- प्रमोद गावडे, होमस्टे चालक
.......................
कोट
फार्मस्टे–होमस्टे आधारित पर्यटनामुळे युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, महिला बचतगट, शेतकरी, कारागीर आणि स्थानिक व्यावसायिक यांना थेट आर्थिक लाभ मिळत आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन उपक्रमांना आवश्यक ते मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन शासनाकडून मिळत राहिल्यास जिल्ह्याची ओळख ‘शाश्वत पर्यटनाचा आदर्श जिल्हा’ म्हणून अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
- नितीन गावकर, फॉर्मस्टे चालक
......................
कोट
जिल्ह्याचे पर्यटन आकडे स्पष्टपणे सांगतात की फार्मस्टे–होमस्टे आधारित शाश्वत पर्यटन हेच सिंधुदुर्गच्या निसर्ग, अर्थव्यवस्था आणि समाजासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरणार आहे. थोडक्यात, सिंधुदुर्गला अधिक पर्यटन नको, तर योग्य पर्यटन हवे. भविष्यातील पर्यटन हे मोठं नसून अर्थपूर्ण असेल. नफा नव्हे, परिणाम महत्त्वाचा असेल. सिंधुदुर्गातील पर्यटनाची व्य़ाख्या ही ‘रोजगार अधिक अभिमान अधिक सिंधुदुर्गाची ओळख’ अशी तयार होत आहे.
- लक्ष्मण आरोसकर, फॉर्मस्टे चालक
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.