विरवडेत अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र
पश्चिम महाराष्ट्र–कोकणातील जखमी वन्यप्राण्यांना तातडीची वैद्यकीय सेवा ; वन विभागाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : वन विभागाच्या वतीने कऱ्हाड तालुक्यातील विरवडे येथे कोल्हापूर सर्कलचे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र उभारले जात आहे. या केंद्रामुळे पश्चिम महाराष्ट्रासह तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांतील जखमी व आजारी वन्यजीवांना तातडीची व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
राधानगरी, कोयना, चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या भागात बिबटे, हरणे, गवे, रानडुकरे, अस्वल, ससे, तरस यांचा मुक्त संचार आहे. अलीकडे मानवी वस्तीमध्येही या वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, विशेषतः ऊसाच्या शेतात बिबट्यांच्या माद्या पिलांना जन्म देताना आढळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विदर्भातून आणलेल्या दोन वाघिणी सोडण्यात आल्याने परिसरात वाघांचा वावरही वाढत आहे.
वन्यप्राणी अनेकदा वाहन अपघात, रेल्वे धडक, जखम किंवा पोषणाअभावी अशक्त अवस्थेत आढळतात. आतापर्यंत कोल्हापूर सर्कलमध्ये उपचार केंद्र नसल्याने अशा प्राण्यांना पुण्याला हलवावे लागत होते. या विलंबामुळे अनेकदा प्राण्यांचा जीव धोक्यात येत होता. पुणे–बंगळूर महामार्ग, मुंबई–गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे उपचार केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात येणार आहे.
---
चौकट
उपचार केंद्राची वैशिष्ट्ये
या केंद्रात २४ तास तज्ज्ञ डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक उपलब्ध असतील. कर्मचाऱ्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. जखमी वन्यप्राण्यांसाठी प्रशस्त व सुसज्ज दवाखाना, वाघ व बिबट्यांसारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी सुरक्षित पिंजरे, तसेच हरणे, गवे, रानडुकरे यांच्यासाठी स्वतंत्र पिंजऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. दुर्दैवाने एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन व अंत्यसंस्काराची सुविधाही याच ठिकाणी उपलब्ध असेल. उपचारानंतर प्राण्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी स्वतंत्र पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-----------
कोट
हे उपचार केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षणाला मोठी चालना मिळणार असून, वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासही मदत होणार आहे.
--प्रकाश पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, दापोली