पुरवणी डोक ः मुणगे यात्रोत्सव विशेष
swt112.jpg ते swt114.jpg
14900
भगवती देवी जत्रोत्सवातील डोळे दीपवणारा पालखी सोहळा.
टीपः swt115.jpg
14901
आदिमायेचा अवतार देवी भगवती
मुणगे येथील श्री देवी भगवती हे असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. देवीचा जत्रोत्सव हा येथील महत्त्वाचा वार्षिक उत्सव. हा जत्रोत्सव २ ते ६ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. शुक्रवारी (ता. २) जत्रोत्सवाचा पहिला महत्त्वाचा दिवस आहे. या यात्रोत्सवानिमित्त...
- विश्वास मुणगेकर, मुणगे
---------------------
सर्व मंगलमांगल्ये, शिवेसर्वार्थ साधिके
शरण्ये त्रयंबकेगौरी नारायणी नमोस्तुते !
आदिमाया आदिशक्ती महिशासूरमर्दिनी देवी भगवती माता
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले देवस्थान म्हणजे मुणगेची श्री देवी भगवती. या देवीच्या छायेत तिच्याच वरदहस्ताने वसलेले निसर्गरम्य ''मुणगे'' गाव त्यांच्या नैसर्गिक ठेवणीने राज्यात कायम चर्चेत राहिलेले आहे. मुणगे हे गाव मालवण, कणकवली, देवगड या तिन्ही तालुक्यांना मध्यवर्ती असणारे ठिकाण. पश्चिमेला अरबी समुद्राचा अथांग असा किनारा, पूर्वेला आचरा खाडी सागरीमार्ग, श्री क्षेत्र कुणकेश्वरकडे जाणारा मार्ग, भगवती देवीच्या मंदिरापासून समुद्र किनार्यापर्यंत दुतर्फा असलेली समृद्ध अशा माड, सुपारीच्या बागा, महाकाय माळरान, सुंदर असे डोंगर या गावाला लाभले आहेत. निसर्गप्रेमाएवढीच मनोभावे श्रद्धा असणारी देवी भगवती या गावचे ग्रामदैवत बनली आहे. देवीच्या मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येतात. जत्रोत्सव, शिमगोत्सव, दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी, दर तीन वर्षांनी देवीचे माहेरवासन दादरे, नवरात्रोत्सव, एकवीस दिवस भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होणारा गणेशोत्सव आदी कार्यक्रम या मंदिरात साजरे केले जातात. गतवर्षी ८ ते ११ मे या कालावधीत देवीची डाळपस्वारी झाली. गावच्या वैभवातील श्री देवी भगवती देवस्थानचे स्थान अग्रभागी आहे. श्री भगवती देवीचे मंदिर गावाच्या मध्यभागी व देवगड-मालवण मार्गावर रस्त्याला लागूनच असल्याने एसटी बसमधून प्रवास करणारा प्रवाशी सुद्धा मंदिरासमोर बस येताच श्रद्धेने नमस्कार करतो.
भगवती मंदिरात प्रवेश केल्यावर भाविकांचे मन शांत व प्रसन्न वातावरणात मोहरून जाते. गाभार्यामध्ये ही देवी महिशासुराचे मर्दन करीत आहे. काळ्या पाषाणात ही मूर्ती कोरलली असून हातामध्ये त्रिशूल, जो महिशासुराच्या मानेवर ठेवला आहे. दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात शंख व चौथ्या हातात ढाल, गळ्यात कवड्याच्या माळा अशी सुंदर, आकर्षक, मनमोहक मूर्ती आहे. नवसाला पावणारी व संकटाला अदृश्य रुपाने धावणारी देवी भगवती माता म्हणून देवीची ख्याती आहे. मंदिरामध्ये सभामंडपातून प्रवेश करून मंदिराच्या अंतरभागात प्रवेश करतो. या भागामध्ये गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते. तेथून आत मंदिरामध्ये प्रवेश करण्यात येतो. या ठिकाणी असलेले लाकडी खांब, त्यावर पुरातनकाळी केलेले कोरीव नक्षीकाम म्हणजे कलाकुसरीचा नमुना पाहायला मिळतो. या भागामध्ये आल्यावर अगरबत्तीच्या दरवळणाऱ्या सुंगधामुळे मन प्रसन्न होते. या भागातून गाभाऱ्यात असणाऱ्या देवीचे दर्शन व ओट्या भरणे आदी कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी देवीच्या डाव्या बाजूला व गाभाऱ्यात जाताना उजव्या बाजूला पाषण आहे. या पाषाणाजवळ भक्तांच्या विनंत्या मांडल्या जातात. हे पाषाण गुरव पुजारी उचलतात. गावकर या पाषाणमूर्तीस विनंती (मेळा) सांगतात. एखादी घटना खरी आहे, असे सांगणे म्हणजे ''फुलावर ये'' असे सांगतात. त्यावेळी ते पाषाण फुलासारखे हलके होते व गुरव पुजारी ते सहज उचलतात. खोटे असेल तर ते पाषाण जड होणार, म्हणजे ते पाषाण गुरव पुजाऱ्यांना उचलता येत नाही. जत्रोत्सवाचे पाच दिवस भाविकांना देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन व देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम केले जातात. या देवीला खण-नारळ व साडीचा नवस केला जातो. मंदिराची रचना आकर्षक असून मूर्ती स्थापनेला सुमारे १३० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या देवीचा शताब्दी महोत्सव १९८९ मध्ये झाला. उद्या (ता.२) सकाळी देवीला अभ्यंगस्नान घालून नवीन वस्त्रालंकारांनी सजवून विधीवत पूजा झाल्यानंतर गावघराची ओटी भरण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन व ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
देवी भगवती मंदिराच्या आवारातीमध्ये श्री देवी अनभवनी, देवी पावणाई, देवी भावय, देव गांगो, देव नवनाथ, देव गायगरब, देव ब्राह्मण, देव बेळेपान, देव गिरावळ आणि बांबरवाडी येथील ऐदेवी बाय आदी देवस्थळे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस देव ''महापुरुषा''चे ठिकाण आहे. देवी भगवती मंदिरात नवरात्रोत्सव, दसरोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, शिमगोत्सव, गणेशोत्सव, देवदीपावली आदी सण-उत्सव साजरे केले जातात. तीन वर्षांनी देवीची तरंगासह गावात डाळपस्वारी होते. गावातील कारिवणेवाडी येथील श्री. पाडावे यांच्या घरी देवी भगवती ''माहेरवाशिणी'' म्हणून दर तीन वर्षांनी जाण्याची प्रथा आहे. यात्रोत्सवात रात्री देवीसमोर पुराणवाचन होते. त्यानंतर देवीची आरती होते. आरतीनंतर देवीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. पालखीची मिरवणूक मंदिराभोवती सोमसूत्री पद्धतीने फिरविली जाते. पालखी सोहळ्यानंतर गोंधळी गायन व कीर्तन होते.
सुमारे तीनशे वर्षांपूर्वी मुणगे गाव ''हेळबादेवी कातवड'' या गावाच्या पूर्वेला वसला होता. श्री देवी बायची ही सर्वांची ग्रामदेवता असावी, असे काही जुन्या लोकांचे मत आहे. लोकांनी श्री देवी बायचीचे स्थान श्री देवी भगवतीला दिले आणि परिस्थितीप्रमाणे गावच्या पुष्कळशा भागाला मध्यवर्ती ठिकाण झाल्याने व सर्वांच्या श्रद्धेने श्री देवी भगवती सर्वांची ग्रामदेवता झाली. साधारणपणे १६०० ते १७०० च्या नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींच्या अंमलाखाली हा भाग येऊन त्याकाळी खर्चासाठी म्हणून सुरुवातीला ५१ रुपये मिळत. एका सनदेने ही रक्कम श्री देवीला मिळाली व काही शेतजमिनी देवस्थानला मिळाल्या, त्या आजही देवस्थानच्या नावाने चालत आहेत. चैत्र महिन्यात दिवाळीपूर्वी एक-एक महिना देवीची पालखी काढली जाते. जागर केला जातो. देवदीपावलीच्या वेळी पूर्वेला असलेल्या बांबरवाडीतून देवीच्या मंदिरापर्यंत पूजा करून गुरवाच्या अंगात वारे आल्यावर मोठा पीठाचा दिवा हातातून घेऊन हा दिवा देवीच्या मंदिरात नेला जातो.
सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक जत्रोत्सव, जो लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीचा उत्सव. पौष पौर्णिमा या दिवशी जत्रोत्सवाला सुरुवात होते. या दिवशी देवीच्या मूर्तीला दागदागिने व नवीन साडी नेसवून सजविले जाते. तिची यथासांग पूजा करून नंतर गावघराची ओटी भरण्यात येते. त्यानंतर भाविकांना श्री देवीचे दर्शन घेण्यास सुरुवात केली जाते. या पाच दिवसांत भाविकांना गाभार्यात जाऊन देवीचे दर्शन घेण्याची मुभा असते. देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. माहेरवाशिणी, सुवासिनी त्याचप्रमाणे दूरदूरचे लोक येतात.
मंगळवारी (ता. ६) लळिताचा कार्यक्रम होणार आहे. मशाल पेटवून ती पेटत असतानाच भाविकांनी केलेले नवस फेडले जातात. देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, विश्वस्त मंडळ प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, वसंत शेट्ये, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर व मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली देवस्थानचा कारभार सुरळीत चालू आहे. देवस्थान समितीमार्फत यात्रोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना लवकरात लवकर देवीचे दर्शन मिळण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
या जत्रोत्सवासाठी दूरदूरच्या भाविकांनी येऊन जाणे शक्य होत नसे. त्यामुळे आलेल्या भाविकांची निवासाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन देवस्थान व ग्रामस्थ, हितचिंतक, देणगीदार यांच्या देणगीतून ''भक्त निवास'' इमारत बांधण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी यात्रेचा कालावधी वगळता इतर दिवसांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येत असतात. दिवसेंदिवस या मंदिराकडे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. बाहेरगावच्या भाविकांसाठी भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री भगवती देवीवर श्रद्धा असलेले असंख्य भाविक आहेत. ते असतील तेथून देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अशा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत देवी भगवतीच्या चरणी तिचे रूप पाहून नतमस्तक होऊया.
-------------
चौकट
तीर्थक्षेत्राचा ''ब'' दर्जा
मुणगेचे सुपुत्र तसेच कोल्हापूर येथील दानशूर व्यापारी (कै.) शांताराम कृष्णाजी तथा बापूसाहेब पंतवालावलकर यांनी यापूर्वी भगवती मंदिर व मंदिर परिसरात लादी बसविली होती. रोख स्वरुपात देणग्या मंदिरास दिल्या होत्या. त्या वेळेपासून खऱ्या अर्थाने या मंदिराचा कायापालट झाला. त्याची दखल आता शासनपातळीवर घेण्यात आली असून, तीर्थक्षेत्राचा ''ब'' दर्जा या देवस्थानला मिळाला आहे.
-------------------------
दृष्टीक्षेपात
* देवी भगवती देवस्थान ''ब'' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा
* मुणगे गावाला ''पर्यावरण संतुलित समृद्ध गाव'' पुरस्कार
* स्वच्छता अभियान तालुकास्तरीय पुरस्कार
* बीमा ग्राम पुरस्कार
* महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त गाव पुरस्कार
-------------------------------------
॥ देवी भगवती माऊली ॥
निसर्गरम्य मुणगे गाव, मुनींवरूनी पडले नाव।
नारळ, सुपारी, कलमाची बाग, सागर किनारी वसले गाव ॥धृ॥
देवी भगवती माऊली तयाची,
रूप तिचे किती दिव्य मनोहारी,
पायावरी तिच्या भक्त होती लीन,
तहान भूक जाई मूर्ती पाहून,
आनंदाने रमती भक्त सारे जण ॥१॥ सागर किनारी वसले गाव ...
पौष पौर्णिमेसी असे यात्रेचा उत्सव,
भरून जाई सारे भाविकांनी गाव,
आनंदाने गाती भक्त तिचे गुणगान,
दर्शन घेऊन तृप्त होई मन,
गोमुखातील पाणी असे निर्मळ,
तहान शमवी होई समाधान ॥२॥ सागर किनारी वसले गाव ...
पाध्ये, महाजन, घाडी, गुरव,
सुतार, सावंत, परिट, पाडावे,
तेली, परब, न्हावी, चाकरीचे लोक,
बारा पाच राहती सेवेसी हजर,
''अमर'' होई चरणासी लीन ॥३॥ सागर किनारी वसले गाव ...
- अमर मुणगेकर
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.