जिल्ह्यातील गुन्हेगारीला पोलिसांचा ‘लगाम’
तपासाला गती ; गुन्ह्यांमध्ये २१.२५ टक्केने वाढ, महिलांवरील गुन्ह्यात आठ टक्के घट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने २०२४-२५ या वर्षात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले असून, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये आठ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्हा पोलिसांच्या वार्षिक गुन्हे आढाव्यातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही महिने गुन्हे कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यात झालेला आहे. पोलिसदलाने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर तपासाचे प्रमाण ४५.२० टक्क्यांवरून थेट ६६.४५ टक्क्यांवर नेले आहे. शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये, विशेषतः खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या प्रकरणांत पोलिसांनी १०० टक्के गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीला गेलेला १ कोटी ३८ लाख ३७ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. वाहनचोरीच्या ३९ पैकी २० प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३,२२४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, १५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. सागरीसुरक्षेसाठी नवीन ई-सायकल आणि भाडेतत्त्वावरील बोटींचा वापर सुरू करण्यात आला असून, २० हजार ४८५ पासपोर्ट प्रकरणे वेळेत निकाली काढून नागरिकांना दिलासा दिला आहे.
------
अमली पदार्थांविरुद्ध ‘मिशन फिनिक्स’
जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत यंदा विक्रमी ७५ गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी हा आकडा केवळ २५ होता. या कारवाईत १८१ किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करून पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीमध्ये ते नष्ट करण्यात आले. फसवणुकीच्या गुन्ह्यांत ३३ टक्क्यांनी घट झाली असून, सायबर सेलने ५ लाख ६८ हजार रुपयांहून अधिक रक्कम नागरिकांना परत मिळवून दिली आहे.
---
सीसीटीएनएस प्रणालीत राज्यात तिसरा
रत्नागिरी पोलिसांनी तांत्रिक आघाडीवरही मोहोर उमटवली आहे. सीसीटीएनएस प्रणालीत रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात सलग तिसरा क्रमांक पटकावला आहे. लैंगिक अपराधांच्या तपासासाठी असलेल्या ‘ITSSO’ प्रणालीत जिल्ह्याची कामगिरी १०० टक्के आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रत्नसेतू’ चॅटबॉट आणि ‘फ्रेंड्स ॲप’ यासारखे उपक्रम राबवले आहेत. ‘मिशन जीवन’ अंतर्गत ८०१ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्रे देऊन पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
----
दृष्टिक्षेपात
* खून आणि खुनाचा प्रयत्नाचे सर्व गुन्हे उघडकीस
* चोरीला गेलेला १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
* वाहनचोरीच्या ३९ प्रकरणांपैकी २० गुन्हे उघड
* सायबर गुन्ह्यातील ५ लाख ६८ हजार मिळवले परत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.