15064
कणकवलीत भटक्या कुत्र्यांना लगाम
संदेश पारकर : नसबंदीसाठी लवकरच एजन्सीची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ : शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच एका एजन्सीची नियुक्ती होईल. या एजन्सीकडून शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज दिली.
येथील नगराध्यक्ष दालनात श्री.पारकर बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, जयेश धुमाळे, रूपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
पारकर म्हणाले, ‘शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सायंकाळ, रात्रीच्या वेळेस हे कुत्रे वाहनांचा पाठलाग करतात. अनेकदा दुचाकीच्या चाकात गेल्याने अपघात होवून दुचाकीस्वार जखमी होतात. तसेच अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे.
पारकर म्हणाले, भटके कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी शहरात तात्पुरते केंद्र तयार केले जाणार आहे. त्यानंतर जाळ्याचा वापर करून एजन्सीमार्फत शहरातील भटकी कुत्री पकडली जातील. कुत्र्यांना ताब्यात घेतल्यानंतर एजन्सीकडून प्रत्येक कुत्र्याला एक नंबर दिला जाणार असून तो नंबर कुत्र्याच्या कानावर असेल. या कुत्र्यांना शहरातील एका केंद्रावर आणून त्यांचे लसीकरण, उपचार तसेच नसबंदी प्रक्रिया केली जाणार आहे. नसबंदीनंतर ज्या भागातून कुत्र्यांना उचलले, त्याच भागात नंतर सोडून दिले जाणार आहे.
कुत्रे पकड आणि नसबंदीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊन एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. या एजन्सीकडून शहराच्या सर्व प्रभागातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबतचे नियोजन होईल. दरम्यान, शहरातील प्रत्येक घरामध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडी जाते. यावेळी तेथे आलेल्या कर्मचाऱ्यांकडेच घरातील कचरा द्यावा. उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नका. यामुळे देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतोय असे श्री.पारकर म्हणाले.
------------
‘त्या’ कर्मचाऱ्यांना ११ हजाराचे मानधन
शहरातील कचरा सफाई तसेच नळपाणी पुरवठा योजनेवर मानधन तत्वावर एजन्सीमार्फत कर्मचारी नेमले जातात. या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार १४ हजार रूपये मानधनाची तरतूद आहे. यामध्ये सुरक्षा अनामत, पीएफ आणि इतर कपाती वगळून किमान ११ हजार रूपये मानधन मिळायला हवे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना केवळ ६ ते ७ हजार रूपये एवढेच मानधन दिले जात होते. ही प्रथा मोडीत काढली असून या कर्मचाऱ्यांना ११ हजार रूपये मानधन देण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्याचे मानधन ११ हजार रूपये प्रमाणे दिल्याची माहिती पारकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.