नाचणी मळणी-सडणीसाठी नवे यंत्र
कोकण कृषी विद्यापीठाचा नवोपक्रम; शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, मजुरी खर्चाची बचत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ः नाचणीतील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे नाचणीसाठी मागणी वाढत आहे. जिल्ह्यात दुय्यम पीक म्हणून नाचणीची लागवड केली जाते. खरीप हंगामात सपाट, वरकस, डोंगरउताराच्या जमिनीत नाचणी लागवड करण्यात येते; पण अलीकडे नाचणी शेतीसाठी मजुरांची कमतरता भासते. नाचणी काढणीनंतर मळणी, सडणी प्रक्रिया कष्टदायक, वेळखाऊ आहे. त्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणी मळणी, सडणीसाठी प्रभावी यंत्र विकसित केले आहे. नाचणी मळणी व सडणी एकाचवेळी दोन्ही कामे होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर आहे.
नाचणी कणसे काढून आणल्यानंतर ती काठीने झोडपली जातात. त्यानंतर काडीकचरा वेगळा केला जातो. नाचणीच्या दाण्यावरील भुसा काढण्यासाठी मुसळाचा वापर करून सडले जाते नंतर वारा घालून भुसा बाजूला केला जातो. नंतर नाचणीचे दाणे मिळतात. यासाठी भरपूर मनुष्यबळ, वेळ, श्रम लागतात. काठीने झोडपल्यामुळे अंगदुखी वाढते व सडताना धूळ तोंडात जात असल्याने आरोग्याच्या तक्रारी संभवतात. त्यामुळे मळणी-सडणीसाठी मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नसल्याने त्यावर पर्याय म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नाचणी मळणी, सडणी यंत्र वापरण्यास तर सोपे आहे शिवाय वाहतुकीस सुलभ आहे. हे विजेवर चालणारे स्वयंचलित यंत्र असून, या द्वारे मळणी केल्यास खर्चात ७२ टक्के बचत होते. या यंत्राला चाके व एक हॅण्डलसुद्धा आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते. एखाद्या पालखीप्रमाणे खांद्यावरूनही ने-आण करता येते.
घरगुती सिंगल फेजच्या मिटरवर हे यंत्र चालते. मळणीची कार्यक्षमता ९९ टक्के असून, धान्यफुटीचे प्रमाण ०.१ टक्केएवढेच आहे. या यंत्राची मळणी सडणीची क्षमता प्रतितास ३६ किलोइतकी आहे. शेतीच्या विविध कामांमध्ये मनुष्यबळासाठी पर्याय म्हणून विद्यापीठातर्फे यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत विविध यंत्रांची निर्मिती केली आहे. नाचणीच्या कणसातून दाणे काढणी-मळणी व त्यांना स्वच्छ करणे-सडणी, ही दोन्ही कामे करते. विद्यापीठातर्फे हे यंत्रविक्रीसाठी शिवाय भाडेतत्त्वावरही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
------------
चौकट
यंत्रामुळे काम सुलभ होणार
नाचणी काढणीनंतरच्या प्रक्रियेतील कष्ट कमी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले नाचणी मळणी, सडणी यंत्र उपयुक्त ठरणार आहे. या यंत्राचे वजन १४० किलो आहे. घरगुती सिंगल फेज मीटरवर हे यंत्र चालते. मळणी, सडणी प्रक्रियेत शारीरिक कष्ट व धुळीच्या त्रासामुळे मानवी आरोग्यावरील होणाऱ्या परिणामाला विराम मिळत असल्याने ते लवकरच लोकप्रिय ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.