ठाकरे सेनेतील दुफळी शिंदे सेनेसाठी फायद्याची
जिल्हा परिषद निवडणूक ; जाधव-राऊतांमधील वादाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल काही दिवसात वाजण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला न घेण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेना भाजपने घेतला आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील दुफळीचा फायदा घेण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात शिंदे सेना यशस्वी झाली तर रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे सेनेला हा मोठा धक्का असेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील चार पालिका आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. राजापूर पालिकेत काँग्रेसने यश संपादित करून जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. देवरूख नगरपंचायतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळाले. त्यामुळे तिथेही अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे. रत्नागिरी, लांजा, देवरूख, गुहागर, खेड या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. जिल्ह्यात ठाकरेंची सेना कुठेही सत्तेत नाही. चिपळूणमध्ये ठाकरे सेनेला सत्तेत येण्याची संधी होती. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांनी जुने वैर विसरून एकत्र येत पालिका निवडणुकीसाठी आघाडी केली होती; मात्र माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्वच जागांवर आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यामुळे शिवसेनेची मते विभागली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष बाराशे मताने निवडून आला. ठाकरे सेनेच्या उमेदवाराला सोळाशे मते मिळाली. ही मते रमेश कदम यांना मिळाली असती तर कदाचित पालिकेत चित्र वेगळे असते. आमदार भास्कर जाधव यांना चिपळूण पालिकेत कधीही यश मिळाले नाही.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात ठाकरे गटाची ताकद आहे; परंतु या पक्षाला सध्या नेतृत्व नाही. संघटनेचा निर्णय घेणारे विनायक राऊत मुंबईत राहतात. भास्कर जाधव यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याच्या विरोधात राऊत निर्णय घेतात. ठाकरे गटातील या दुफळीमुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. हे कार्यकर्त्यांना पटवून सांगून त्यांना शिंदेसेनेत घेण्यासाठी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह पक्षाचे काही कार्यकर्ते ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. पालिका निवडणूक झाल्यानंतर शिंदे सेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आढावा घेण्यात आला. भाजपला कोणत्या जागा सोडायच्या आणि आपण कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा झाली.
कोट
बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांनी पालिका निवडणुकीत आम्हाला मतदान केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे मतदार यश प्राप्त करून देतील. आमचे उमेदवार चांगले मताधिक्य घेऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत जातील.
- सदानंद चव्हाण, उपनेते, शिंदे सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.