कामगारांच्या तुटवड्याने
बागायतदारांची कोंडी
सिंधुदुर्गात कसरत; २५ टक्केच नेपाळी दाखल
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः कोकणात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २० ते २५ टक्केच नेपाळी कामगार आंबा, काजू बागांमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या कामगारांवर अवलंबून असलेल्या बागायतदारांची मोठी कोंडी झाली असून या वर्षीच्या हंगामात बागायतदारांना या कामगारांविना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा हा परिणाम मानला जात आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आंबा, काजूचे मोठे क्षेत्र आहे. कोकणातील तरुणाला कायमच मुंबई, पुणे आदी शहरांचे आकर्षण होते, परंतु मागील पंधरा-वीस वर्षांत स्थानिक तरुण रोजगाराच्या निमित्ताने विविध शहरांमध्ये स्थंलातरित झाला. त्यामुळे कोकणातील हजारो हेक्टरवरील आंबा, काजू बागांमध्ये मजुरांची वानवा निर्माण झाली. त्यातच स्थानिक कामगार हे चिरेखाण, गवंडीकामाकडे अधिक वळल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबा, काजू बागेतील कामांसाठी मजूर मिळेनासे होऊ लागले. आंबा बागेत सतत काम असते. त्यातही ऑक्टोबर ते मे अखेरपर्यत अनेक कामे असतात. बागांची साफसफाई, फवारण्या करणे, आंबा काढणी ते काढणी पश्चात ग्रेंडिंग, पॅकिंग अशी अनेक कामे असतात. गेली काही वर्षे ही सर्व कामे नेपाळी कामगार करीत आहेत. स्थानिकांकडून सर्व कामांचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. हे कामगार अतिशय प्रामाणिकपणे काम करीत असल्याने त्यांची मागणी वाढतच गेली.
कोकणात हजारो आंबा, काजू बागायतदार आहेत. काहींकडे शेकडो आंबा बागा आहेत. अशा बागायतदारांकडे शेकडो नेपाळी कामगार काम करतात. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये हे कामगार येतात आणि मे अखेरीला पुन्हा नेपाळला जातात. ५ ते १० कामगार कायमस्वरुपी राहतात. सुरुवातीला २५ ते ३० हजार असणाऱ्या नेपाळी कामगारांच्या संख्येत आता प्रचंड वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दीड ते दोन लाख नेपाळी कामगार आंबा, काजू बागांमध्ये होते असे सांगितले जाते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून नेपाळमध्ये धार्मिक आणि राजकीय तणावाचे वातावरण आहे. नेपाळ सरकारने घातलेल्या सोशल मीडियावरील बंदीनंतर तेथील तरुण पिढी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे तेथील वातावरण तणावाचे आहे. भारत-नेपाळ सीमेवर सतर्कता वाढविण्यात आली आहे. नेपाळ सरकारकडून सीमेवर तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोकणात येणारे अनेक कामगार तेथेच अडकून आहेत. केवळ २० ते २५ टक्केच कामगार कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणातील बागायतदार अडचणीत आले आहेत. कामगाराविना शेकडो एकरच्या बागांमध्ये फवारण्या करणे अडचणीचे होत आहे. बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांत जर कामगार आले नाही तर आंबा काढणी करताना बागायतदारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
....................
चौकट
मजुरीचे दर वाढले
नेपाळी कामगार गेल्यावर्षीपर्यंत महिना १३ हजार रुपये घेत होता, तर जोडी १८ हजार रुपयांपर्यत मजुरी घेत होती. या वर्षी कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे मजुरीचा दर वाढला आहे. कामगार पंधरा ते सतरा हजार रुपये; तर जोडी २२ हजार रुपयांपर्यंत मजुरी घेत आहेत.
...................
चौकट
स्थानिक कामगारांवर भरवसा नाहीच
स्थानिक कामगार बागांमध्ये काम करतात, परंतु ते विविध सण, उत्सवांत अनेकदा व्यस्त असतात. याशिवाय एप्रिल, मे महिना हा लग्नसराईसह विविध उत्सवांचा असतो. या कालावधीत कुणीही स्थानिक कामगार आंबा, काजू बागेमध्ये काम करण्यासाठी जात नाही. त्यामुळे बागायतदारांचा स्थानिक कामगारांवर अजिबात भरवसा नाही.
.....................
कोट
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी २० टक्केच नेपाळी कामगार दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आंबा काढणी करताना बागायतदारांची मोठी अडचण होणार आहे.
- माधव साटम, आंबा बागायतदार, शिरगाव, ता. देवगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.