rat12p30.jpg
17158
पावस ः मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर फलकांचा अभाव.
--------
पावस, गणेशगुळेत मार्गदर्शक फलकांअभावी गैरसोय
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना त्रास ; प्रशासन दखल घेणार का ?
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १२ः कोकणातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आणि गणेशगुळे येथील प्राचीन गणेशमंदिर ही ठिकाणे आज महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अग्रक्रमाने घेतली जातात; मात्र, या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर मार्गदर्शक फलकांचा अभाव असल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पावस आणि गणेशगुळे ही दोन्ही स्थळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात; मात्र, मुख्य रस्त्यांच्या कडेला किंवा चौकाचौकात ही स्थळे किती अंतरावर आहेत किंवा कोणत्या दिशेला आहेत, याची माहिती देणारे फलकच लावलेले नाहीत. त्यामुळे परजिल्ह्यातून किंवा लांबून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी स्थानिक वाटसरूंना वारंवार पत्ता विचारावा लागत आहे. संबंधित क्षेत्रातील जबाबदार घटक आणि संचालक मंडळाच्या ‘नाकर्तेपणामुळे’ ही समस्या निर्माण झाली आहे. रस्तेविकास आणि पर्यटन विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, साधे दिशादर्शक फलक लावण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा अपरिचित पर्यटकांना फलकांअभावी रस्ता चुकल्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. कोकणात पर्यटन वाढावे, असे वाटत असेल तर किमान पायाभूत सुविधा आणि माहिती देणारे फलक तरी प्रशासनाने लावायला हवेत, अशा प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करत आहेत. त्यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी ते पावस आणि पावस ते गणेशगुळे या मार्गावरील मुख्य वळणांवर ठळक अक्षरातील दिशादर्शक फलक लावले जावेत अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देणारे नकाशा फलक बसवले तर त्याचा फायदा निश्चितच परजिल्ह्यातील पर्यटकांना होणार आहे. रात्रीच्या वेळी चमकणारे फलक लावले तर दिशाभूल होणार नाही. पर्यटकांच्या या मागणीची संबंधित विभागाकडून दखल घेतली जाणार का? याची उत्सुकता लागलेली आहे.
कोट
आम्ही कोकण पाहण्याकरिता सहकुटुंब प्रवास करत आलो तेव्हा रत्नागिरी सोडल्यानंतर पावस व गणेशगुळेकडे जाण्यासाठीचा मार्ग शोधणे कठीण जाते. रस्त्यावर काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे फलक दिसतात; परंतु पर्यटनस्थळाच्या ठिकाणी जाण्याकरिता कुठेही फलक दिसला नाही. त्यामुळे तिकडे जाण्याकरिता अडचणीचे ठरत आहे. पावस, गणेशगुळे या दोन्ही ठिकाणी जायचे झाल्यास अरूंद रस्त्याचा व वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिकडे जाण्यामध्ये अडचणी येतात. याकरिता संबंधित संस्थाचालकांनी मार्गदर्शक फलक लावणे काळाची गरज आहे अन्यथा पर्यटक असे मार्गदर्शक फलक असतील तिकडेच जाणे पसंत करतील.
- अतुल देसाई, पर्यटक, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.