लोगो...दहावी, बारावी बोर्ड परीक्षा
कॉपीमुक्तीसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे
राजेश क्षीरसागर ; केंद्रसंचालकांसह कर्मचाऱ्यांचीही अदलाबदल होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी आज अखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेऊन पुढील दहा दिवसात कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. परीक्षाकेंद्राचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
बारावीची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी, लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होईल. शासननिर्णय १३ मे २०२५ नुसार शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश दिले आहेत.
कॅमेरे बसवल्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज जतन करून ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उपद्रवी व संवेदनशील परीक्षाकेंद्रांची यादी करून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तिथले सीसीटीव्हीचे ऑनलाईन फूटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती यांच्याकडे देण्यात येणार आहे.
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वच परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. गतवर्षी दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार झाला नव्हता व बारावीच्या परीक्षेत एक कॉपी प्रकार निदर्शनास आला होता.
चौकट १
१७१२ वर्गात सीसीटीव्ही
एकूण १७५ केंद्रे असून, त्यापैकी १०वीसाठी ११४ व इ. १२वीसाठी ६१ केंद्रे आहेत. परीक्षेसाठी ३ हजार ४० वर्गखोल्यांची आवश्यकता असून, त्यापैकी १७१२ खोल्यांमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित १३२८ वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या संस्थाचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. १२वीसाठी २१ जानेवारी व १०वीसाठी ३० जानेवारीपर्यंत अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म भरता येणार आहे. १० जानेवारीअखेर कोकण विभागीय मंडळात १०वीसाठी २५ हजार ७४८ व १२वीसाठी २३ हजार ९९४ आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत.
कोट
नियंत्रण कक्षातून कॅमेराद्वारे किती संवेदनशील परीक्षाकेंद्रांना जोडता येईल याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळून येतील तेथे तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षेची सर्वसमावेशक तयारी सुरू आहे. शाळास्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.