swt1415.jpg
17774
दोडामार्ग ः तालुक्यातील काजू कलमांना मोहोर आला असून बदललेल्या वातावरणामुळे तो कोमेजून जाण्यास सुरुवात झाली आहे.
उष्णतेचा चटका, ढगाळतेचा फटका
काजू पिकाला नव्या संकटाची धास्ती; आंब्याचाही मोहोर कोमेजला
संदेश देसाई ः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ ः थंडीने जोर धरलेल्या पोषक अशा वातावरणामुळे चांगल्या प्रकारे बहरलेला काजू, आंबा शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरला होता. मात्र, गेले चार दिवस वातावरणात झालेला बदल शेतकऱ्यांसाठी धास्तीचे कारण बनला आहे. ढगाळ वातावरण आणि अचानक वाढलेला उष्णतेचा पारा यामुळे आंबा व काजूचा मोहोर कोमेजला आहे. स्थिती अशीच राहिली तर विशेषतः काजूचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात आंब्याच्या तुलनेत काजू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः तालुक्यातील डोंगराळ भागात काजूची लागवड अधिक असल्याने काजू हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. यंदा सुरुवातीच्या काळात थंडीचे प्रमाण अनुकूल राहिल्याने काजू पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून दमट व ढगाळ हवामानामुळे फुललेल्या मोहोरावर काळवी पसरली असून तो कोमेजून गेला आहे. ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या आर्द्रतेचा फटका थेट मोहोरावर बसत आहे. काही ठिकाणी तर मोहोर गळण्याचे प्रमाण वाढले असून फळधारणा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी यंदाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बागा डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे तेथे पिकांची निगा राखणे तसेच आवश्यक फवारणी व व्यवस्थापन करणे कठीण ठरत आहे. त्यातच प्रतिकूल हवामानामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले असून तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढील काळात हवामान अनुकूल झाले तर, काही प्रमाणात नुकसान होण्यापासून बचाव होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. परंतु, सध्या तरी बहरलेल्या काजू व आंबा मोहोराच्या कोमेजण्याने तालुक्यासह जिल्ह्यातील बागायतदार चिंतातुर झाले आहेत.
चौकट
थंडी चांगली पडली पण...
हवामानातील थंडी काजू, आंबा पिकासाठी अत्यंत पोषक मानली जाते. जिल्ह्यात यंदा सुरुवातीच्या काळात थंडीचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने काजूसह आंबा कलमांवर चांगला मोहोर येण्यास मदत झाली होती. थंड व कोरडे वातावरण असल्यास मोहोर टिकून राहतो आणि फळधारणा होण्याची प्रक्रिया सुरळीत होते. मात्र, हवामानात अचानक बदल झाल्याने त्याचा परिणाम या दोन्ही पिकांवर जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
चौकट
फवारणी जाणार वाया
सतत ढगाळ वातावरण, वाढलेली उष्णता आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे काजूवरील मोहोर कोमेजत असल्याने शेतकऱ्यांनी केलेली फवारणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महागडी औषधे, मजुरी व वाहतुकीवर मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. विशेषतः डोंगराळ भागात फवारणी करणे कठीण व खर्चिक ठरत असून, उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
कोट
पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण कायम राहिले तर नुकसान अधिक वाढू शकते. आधीच वाढलेला मजुरी खर्च, औषधांची वाढती किंमत आणि शेती व्यवस्थेवरील खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार हे निश्चित. त्यातच उत्पादन घटण्याची भीती असल्याने बागायतदार मानसिक तणावात खाली आहे.
- काजू बागायतदार, दोडामार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.