कोकण

घर चालवतानाचे खर्च अन् बजेट

CD

पैसा बोलतो, आपण ऐकतो !.................लोगो
(९ जानेवारी टुडे २)

घर चालवतानाचे खर्च अन् बजेट

आता केंद्रीय बजेटचे दिवस येत आहेत तसेच बजेट घरगुतीही असतं. घरगुती बजेट म्हटलं की, अनेकांच्या मनात एकच चित्र उभं राहतं. खर्चावर सतत बंधन, इच्छा दाबून ठेवणं आणि परवडत नाही हे वाक्य वारंवार ऐकणं. प्रत्यक्षात मात्र बजेटचा अर्थ यापेक्षा वेगळा आहे. बजेट म्हणजे आयुष्य लहान करणं नाही; ते आयुष्य अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करणं आहे. पैसा कमी आहे की जास्त, यापेक्षा तो कसा वापरायचा याचा निर्णय बजेटमधून घेतला जातो. घरगुती बजेट ही सतत चालणारी गोष्ट आहे.
- rat१५p१.jpg-
26O17895
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
----
घर चालवताना अनेक खर्च अपरिहार्य असतात. घरभाडं किंवा कर्जहप्ता, किराणा, वीज-पाणी, शिक्षण, आरोग्य याशिवाय काही खर्च ऐच्छिक असतात. कपडे, बाहेर जेवण, प्रवास, ऑनलाइन खरेदी. जेव्हा या दोघांमधील सीमारेषा धूसर होते तेव्हा समस्या निर्माण होते. दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा गरज आणि इच्छा यामधील फरक विसरतो. एक साधं उदाहरण पाहू. ‘ऑनलाइन सेल चालू आहे’, ‘आजच ऑफर संपते’, ‘नो कॉस्ट EMI आहे’ अशा कारणांमुळे वस्तू घेतली जाते. त्या क्षणी निर्णय योग्य वाटतो; पण काही दिवसांनी लक्षात येतं की, ती वस्तू गरजेची नव्हती आणि त्यासाठी वापरलेले पैसे इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता आले असते. अनेकदा छोटे खर्च दुर्लक्षित होतात. रोजची ऑनलाइन ऑर्डर, वारंवार घेतलेला कॉफीचा कप, अनावश्यक अ‍ॅप सबस्क्रिप्शन हे खर्च स्वतंत्रपणे किरकोळ वाटतात; पण महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाअखेरीस ते एकत्र पाहिले की, त्यांचा परिणाम जाणवतो. बजेटमुळे पैसा कुठे जातो याचं स्पष्ट चित्र समोर येतं. ही जाणीवच अर्थसाक्षरतेचा पहिला टप्पा आहे.
घरगुती बजेटचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता. आपण नसतानाही आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत पडू नये ही प्रत्येकाची इच्छा असते. आज उत्पन्न नियमित असलं तरी उद्याबद्दल खात्री नसते. अचानक उद्भवणारे आजार, नोकरीतील बदल, व्यवसायातील अडचणी, कोविडसारखी परिस्थिती अशा वेळी आर्थिक तयारी असेल तर ताण कमी होतो. बजेटमुळे बचत, विमा आणि भविष्यासाठीची तरतूद या गोष्टी आपोआप चर्चेत येतात आणि त्या केवळ कल्पना न राहता नियोजनाचा भाग बनतात. आपण नसतानाही आपल्या कुटुंबाला आर्थिक धक्का बसू नये ही काळजी बजेटच्या केंद्रस्थानी असते. हा विषय मृत्यू किंवा आपत्कालीन परिस्थितीपुरता मर्यादित नसतो; तो कुटुंबाच्या मानसिक शांततेशी जोडलेला असतो.
महत्त्वाचं म्हणजे अर्थसाक्षरता ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. ती कोणत्याही पुस्तकात किंवा एका लेखात पूर्णपणे समजत नाही. खर्च नोंदवण्याची सवय, निर्णय घेताना तुलना करण्याची सवय, चुकांमधून शिकण्याची सवय यांतून ती हळूहळू सवयीने येते. सुरवातीला बजेट पाळणं अवघड वाटू शकतं. काहीवेळा नियोजन फसतंही; पण या प्रक्रियेतूनच आर्थिक शिस्त तयार होते.
अनिश्चिततेला सामोरं जाताना थोडी स्पष्टता मिळावी, निर्णय घेताना आत्मविश्वास असावा आणि भविष्याबद्दल मनात सतत भीती राहू नये यासाठी बजेट उपयोगी ठरतं. या सगळ्यात आर्थिक नियोजन खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबाने महिन्याला ठराविक रक्कम सहलीसाठी किंवा बाहेर खाण्यासाठी बाजूला ठेवलेली असेल, तर त्या खर्चाचा आनंदही मोकळेपणाने घेता येतो. उलट, नियोजन नसताना केलेला तोच खर्च नंतर इतर गरजांवर गदा आणतो आणि आनंदाऐवजी अपराधभाव निर्माण करतो. बजेट म्हणजे प्रत्येक इच्छा मारून टाकणं नव्हे तर योग्य वेळी योग्य खर्च करण्याची क्षमता. दैनंदिन आयुष्यात बचतीचंही असंच असतं. अनेकांना असं वाटतं की, ‘उरलं तर बचत करू’. प्रत्यक्षात मात्र महिना संपेपर्यंत काहीच उरत नाही. उलट, ज्यांनी आधी बचत आणि नंतर खर्च अशी सवय लावलेली असते त्यांना उत्पन्न कमी असलं तरी स्थिरता जाणवते. हा फरक उत्पन्नाचा नसून सवयीचा आणि नियोजनाचा असतो. ही सवय बजेटमधूनच तयार होते.
अर्थसाक्षरतेची ही पायरी पार केली, की आपल्याला मोठ्या आर्थिक निर्णयांकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. वैयक्तिक बजेट आणि देशाचं आर्थिक नियोजन यातला समान धागा लक्षात यायला लागतो. घरासारखाच देशालाही निवडी कराव्या लागतात, प्राधान्यक्रम ठरवावे लागतात आणि मर्यादांमध्ये निर्णय घ्यावे लागतात. या साम्याचा अर्थ काय आणि देशाच्या पातळीवर हे निर्णय कसे घेतले जातात याबाबत पुढील लेखात.


(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहेत.)

municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting Updates : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान संपले, कोणत्या जागी किती टक्के मतदान झाले?

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Rail Tour Package: भाविकांसाठी खुशखबर! आता फक्त १३ हजारांत श्रीशैलम दर्शन; जाणून घ्या रेल्वे टूर पॅकेज

SCROLL FOR NEXT