‘वराडकर’मध्ये
भूगोल सप्ताह
दापोली ः येथील वराडकर-बेलोसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक भूगोल दिनानिमित्त भूगोल विभागाच्या वतीने विविध शैक्षणिक व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करून भूगोल सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, पर्यावरणीय जाणीव वाढवणे तसेच संशोधनवृत्तीला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. भूगोल सप्ताहाच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, संशोधन अहवालांचे प्रकाशन व विषयतज्ज्ञांची व्याख्याने घेण्यात आली. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. बिभिषण ढवळे, प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड उपस्थित होते.
निकम विद्यालयात
भाषा संवर्धन पंधरवडा
सावर्डे ः सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमाची सुरवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. स्फूर्ती जाधव यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे महत्त्व सांगत या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व स्पर्धांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी मराठी भाषा संवर्धन शपथ घेतली.
पालगडमधील
रस्त्यांची दुरवस्था
दापोली ः तालुक्यातील पूज्य साने गुरुजी यांचे जन्मस्थान असलेल्या पालगड गावातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी येथील व्यापाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानुसार, पालगड हे पूज्य साने गुरुजी यांचे जन्मगाव असून, शासनाने उभारलेल्या स्मृतीभवनाकडे जाणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. याच रस्त्यावरून माध्यमिक व प्राथमिक शाळा, बँका, पतसंस्था, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालय तसेच बसस्थानकाकडे ये-जा केली जाते; मात्र अनेक वर्षांपासून रस्त्याची साधी डागडुजीही केलेली नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
धनगरवाडीत
रस्त्याचे भूमिपूजन
लांजा ः तालुक्यातील कोंडगे-धनगरवाडी येथील रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते झाले. शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने त्यांनी जोरदार विकासकामांचा धडाका लावला आहे. याच अनुषंगाने आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत कोंडगे धनगरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण काम मंजूर झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.