swt191.jpg
18802
साळेल ः येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
‘एनएसएस’चे राष्ट्र उभारणीत योगदान
साईनाथ चव्हाण ः साळेल येथे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : देशाचे सुजाण नागरिक बनण्यात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदान, परस्परांबद्दल आदर आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची जाणीव यातून निर्माण होते, असे प्रतिपादन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी साळेल येथे केले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या एनएसएस विभागाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर साळेल येथे पार पडले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सामाजिक प्रश्नांची जाण निर्माण होण्यासाठी एनएसएस मोठा हातभार लावते, असेही श्री. चव्हाण यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साळेल सरपंच रवींद्र गावडे यांनी, विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा देत ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक त्या सर्व सहकार्याचे आश्वासन दिले. पंचायत समिती माजी सदस्य कमलाकर गावडे यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याचे आवाहन केले. प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनीही एनएसएसच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साध्य करून घेण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच लक्ष्मण परब, संचालक संदेश कोयंडे, ग्रामसेविका स्वरा परब, पोलिसपाटील रवींद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गावडे, संपदा गावडे, समन्वयक डॉ. देविदास हारगिले, प्रा. प्रमोद खरात, प्रा. डॉ. संकेत बेळेकर, डॉ. उज्ज्वला सामंत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संग्रामसिंह पवार यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी सचिव सर्वेश राणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. देविदास हारगिले यांनी, सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. आभार प्रा. डॉ. संकेत बेळेकर यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नरेश गावडे, राजाराम गावडे, मुरारी गावडे यांच्यासह साळेल ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.