फिजिओ संवाद ..........लोगो
(१४ जानेवारी टुडे ३)
फिजिओथेरपी म्हणजे
खबरदारीही आहे
बहुतेक लोक जेव्हा वेदना असह्य होते तेव्हा फिजिओथेरपीकडे वळतात. फिजिओथेरपी हा शेवटचा उपाय आहे का? तर नाही. फिजिओथेरपी हा शेवटचा उपाय नसून ती खबरदारीसुद्धा आहे. दुखणे अंगावर काढण्याची पद्धत आपल्याकडे खूप प्रमाणात आहे. नंतर बघू, नंतर बघू असे म्हणत एक वेळ अशी येते की, वेदना सहन होण्याच्या पलीकडे जाते. त्यानंतर फिजिओथेरपीला सुरुवात केल्याने उपाय होण्यासाठी जास्त वेळ लागतो. तोपर्यंत धीर संपलेला असतो आणि मग फिजिओथेरपी देखील लवकर रिझल्ट देत नाही. आपल्याकडे सर्रास चालणारा हा पॅटर्न बदलणे हीच खरी शरीराबद्दलची साक्षरता आहे.
- rat२०p१.jpg-
26O18956
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT) B.P.Th.
-----
काही दिवसांपूर्वी क्लिनिकवर एक पेशंट आल्या होत्या. साधारण दोन वर्षे त्यांचा पाय दुखत होता; पण सुरुवातीला वेदना एवढीही नव्हती की, त्यावर गोळ्या औषधे घ्यावीत किंवा शस्त्रक्रियेपर्यंतदेखील वेळ गेलेली नाही; पण ते दुखणे अंगावर काढल्याने हळूहळू दुखण्याची तीव्रता वाढत गेली, पायाचे दुखणे कमरेपर्यंत पोहोचले आणि शेवटी गुडघ्यांची झीज होऊन शस्त्रक्रिया हाच पर्याय उरला. हे सर्व टाळता येऊ शकले असते जर वेदनेच्या सुरुवातीलाच फिजिओथेरपी उपचार सुरू केले असते. दुखणे येण्यामागे एखादे विशिष्ट कारण असते किंवा काही गोष्टींचा एकत्रितपणे प्रत्यय वेदनेत येतो, हे आपण मागील लेखांमध्ये वाचले. त्या गोष्टी सुरुवातीलाच ठीक केल्या तर त्याचे होणारे दीर्घकालीन वाईट परिणाम टाळता येऊ शकतात.
पाय दुखू लागल्या लागल्या पायाच्या स्नायूंची ताकद वाढवणे, आखडलेपणा कमी करणे, नियमित व्यायाम करणे, शरीराबद्दलची जागरूकता वाढवणे या गोष्टी केल्या तर छोट्या दुखण्याचे मोठ्या दुखण्यात होणारे रूपांतरण आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ, गुडघा दुखू लागल्यास गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची ताकद वाढवणे, सांध्याची हालचाल टिकवून ठेवणे, दोन्ही गुडघ्यांवर समान वजन घेण्याची सवय करणे, ज्या सवयींमुळे दुखणे वाढू शकते त्या सवयी बदलणे, अशा गोष्टी सुरुवातीलाच केल्यास शस्त्रक्रियेपर्यंत जाण्याची शक्यता टाळता येते.
दुखणे आल्यानंतर तसेच दुखणे येण्यापूर्वीदेखील फिजिओथेरपी हा निरोगी राहण्यासाठी उत्तम मार्ग आहे उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. फिजिओथेरपी करण्यासाठी एखाद्या फिजिशियन किंवा सर्जनच्या सल्ल्याची वाट न बघता प्रत्येकाने योग्य वेळ ओळखली पाहिजे. फिजिओथेरपी फक्त दुखणे आल्यानंतरच काम करते, हा गैरसमज दूर केला पाहिजे. दुखणे येऊ नये म्हणून फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने नियमित व्यायाम करणे, जीवनशैली सुधारणे, आराम आणि आहाराच्या सवयी व्यवस्थित ठेवणे या गोष्टी पाळल्यास वेदना येण्याची शक्यता कमी होते. वेदना सहन करणे ही ताकद नसून शरीराकडे केलेले दुर्लक्ष आहे. शरीराने दिलेले इशारे योग्य वेळी ऐकले आणि योग्यवेळी फिजिओथेरपी सुरू केली तर वेदना येण्यापूर्वीच किंवा वेदना वाढण्यापूर्वीच तिला थांबवता येऊ शकते.
काही वेदनांमध्ये शस्त्रक्रियेला पर्याय नसतो. अशा परिस्थितीत फिजिओथेरपी ही संलग्न उपचारपद्धती म्हणून फायदेशीर ठरते. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर व्यवस्थित फिजिओथेरपी केल्यास ते शस्त्रक्रिया सुसह्य होण्यास आणि त्यातून दैनंदिन जीवनात सुरळीतरित्या परत येण्यास लवकर मदत होते. खांद्याची, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, हिप जॉईंट बदलणे, गुडघे बदलणे, लिगामेंटच्या शस्त्रक्रिया या आणि अशा अनेक आजारांमध्ये फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण ठरते. त्यासोबतच पॅरालिसिस, स्पायनल कॉर्ड इन्जुरी, GBS आणि तत्सम न्यूरो आजारांमध्ये फिजिओथेरपी उपचार रुग्णाला स्वावलंबी बनवण्यास मदत करतात. लहान मुलांच्या वाढीमध्ये येणाऱ्या अडचणी, वयोवृद्धांना येणाऱ्या चालण्याच्या समस्या यांमध्ये फिजिओथेरपी उत्तमप्रकारे काम करते. हृदय आणि श्वासनसंस्थेच्या आजारांमध्ये आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला फिजिओथेरपी उपचार केल्यास दैनंदिन जीवनामध्ये चांगले परिणाम दिसतात. तसेच खेळाच्या दुखापती आणि खेळाडूंचे शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यात फिजिओथेरपीचा मोठा वाटा आहे.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.