18987
सावंतवाडी शहर ‘आदर्श’ बनवू
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले ः सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ तयार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः येथील पालिकेच्या कारभाराला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ सादर केला. सावंतवाडी हे माझे कुटुंब असून, शहराला राज्यातील एक ‘मॉडेल शहर’ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजपचे अन्य नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष सौ. भोसले म्हणाल्या, ‘निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना ‘स्वच्छता’ हे पहिले पाऊल आहे. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना राबवताना वेंगुर्ले शहराच्या धर्तीवर यापुढे शहरात नवनवीन उपक्रम राबवले जातील. बसस्थानक, नरेंद्र उद्यान आणि शहरातील सर्व लहान-मोठ्या उद्यानांची स्वच्छता करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून एक ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात सावंतवाडीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे ध्येय आहे. शहरात गॅस पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेणार असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘कचरा डेपोची समस्या सोडवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण आणि रिसायकलिंगवर भर दिला जाईल. शहराच्या सीमेवर टाकला जाणारा कचरा ही मोठी समस्या असून, त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील. येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि महिला रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सावंतवाडीत लवकरच मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ‘मिशन रेबीज’च्या माध्यमातून दीड वर्षात निकाली काढला जाईल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘पे अँड पार्क’ आणि ‘नो पार्किंग झोन’ निश्चित करून कडक कारवाई केली जाईल. सावंतवाडीच्या वैभवात भर टाकणारे मँगो टू हॉटेल (पर्यटन सुविधा केंद्र), रघुनाथ मार्केट आणि हेल्थ पार्क यांसारखे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले जातील. शहरात नवीन ‘फूड पार्क’ उभारण्यासाठी मानस असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, दिपाली सावंत, मोहिनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, नीलम नाईक, सविता टोपले, दुलारी रांगणेकर, प्रतीक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे आदी उपस्थित होते.
........................
सावंतवाडी हेच कुटुंब
काही वैयक्तिक कारणास्तव मी काही दिवस सुटीवर जाणार असले, तरी ऑनलाईन यंत्रणेद्वारे मी सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात असेन. सावंतवाडी हे माझे कुटुंब आहे आणि शहराच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. या काळात सावंतवाडीकर मला नक्कीच साथ देतील, असे भावनिक आवाहन नगराध्यक्षा भोसले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.