-rat२२p१.jpg-
२६O१९३८३
रत्नागिरी ः आसमंत फाउंडेशनच्या माध्यमातून सहा किल्ल्यांत आढळलेली जैवविविधता. ट्री हॉपर, पानांसारखे पाय असलेल्या कीटकांची अंडी, पांढऱ्या पोटाचा समुद्री गरूड, लहान शेंडी असलेला टर्न.
-------
सागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान
‘आसमंत’चे सर्वेक्षण ; दुर्मिळ वनस्पती, जीवसृष्टीचा ठेवा, रत्नागिरी- रायगड किनारपट्टीवरील किल्ले
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणाच्या अहवालातून कोकणातील सागरी किल्ल्यांवर समृद्ध व संवेदनशील जैवसंपदा नांदत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्यातून आसमंत सागर महोत्सवाच्या (सीव्हर्स) पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते.
चौथ्या सागर महोत्सवात या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालाच्या अभ्यासातून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. आसमंतचे संस्थापक, संचालक नंदकुमार पटवर्धन यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांनी सर्वेक्षणाचे काम केले. पावसाळा व हिवाळ्यात अभ्यास केला. काही किल्ल्यांवर पर्यटक येतात म्हणून सरपटणाऱ्या प्राण्यांना मारण्याचे प्रकार घडतात, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.
या अभ्यासात मुरूड- जंजिरा, कुलाबा (अलिबाग), खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग (रायगड जिल्हा) तसेच अर्नाळा (पालघर) या सहा सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवरील खडकाळ बेटे, भरती-ओहोटी क्षेत्रे, किल्ल्यांच्या भिंती, बुरूज, पडके बांधकाम आणि मोकळ्या जागांमुळे येथे विविध सूक्ष्म अधिवास निर्माण झाले असून, त्यामुळे अनेक जीवप्रजाती टिकून आहेत.
अहवालानुसार, या किल्ल्यांवर कीटक, फुलपाखरे, खेकडे, शिंपले, गोगलगायींसारखे अपृष्ठवंशी जीव सर्वाधिक संख्येने आढळतात तर त्यानंतर पक्षीप्रजातींची संख्या लक्षणीय आहे. किल्ल्यांचे समुद्राकडे तोंड असलेले बुरूज, मोकळी प्रांगणे व शांत परिसर हे स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांसाठी महत्त्वाचे थांबे ठरत आहेत.
अहवालात अनियंत्रित पर्यटन, कचरा, प्लास्टिक प्रदूषण, प्रकाशयोजना आणि मानवी हस्तक्षेपामुळे किल्ल्यांवरील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले संवर्धन करताना जैवविविधतेचा विचार, पर्यावरणपूरक पर्यटन, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि नियमित निरीक्षण यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
----
चौकट १
कासव, स्टारफिशची नोंद
विशेष म्हणजे, अर्नाळा किल्ल्यावर आढळलेली ‘इंडियन फ्लॅपशेल टर्टल’ ही कासवाची प्रजाती आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘धोक्यात’ म्हणून नोंदवलेली आहे तर मुरूड जंजिरा किल्ल्याच्या परिसरात समुद्रीताऱ्यांसह (स्टारफिश) व सी अॅनेमोनसारख्या सागरी जीवांची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद किल्ल्यांच्या आसपासच्या सागरी परिसंस्थेचे आरोग्य दर्शवते.
--------
चौकट २
शेवाळ वैशिष्ट्यपूर्ण
किल्ल्यांवर उगवणाऱ्या औषधी व क्षारसहिष्णू वनस्पती, पावसाळ्यात बहरणारी हिरवळ आणि खडकांवर वाढणारे शेवाळ हे या जैवविविधतेचे वैशिष्ट्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात जैविक हालचाली वाढतात तर पावसानंतरचा काळ पक्षी व सागरी जीव निरीक्षणासाठी अधिक अनुकूल ठरतो.
------------
कोट
कोकणातील हे सागरी किल्ले ऐतिहासिक वारशासोबतच निसर्गवैभव जपणारे ‘जिवंत वारसास्थळ’ असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही धोरण राबवण्याची गरज या अभ्यासातून स्पष्ट झाली आहे.
- नंदकुमार पटवर्धन, संस्थापक संचालक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.