20026
मालवणात ३१ पासून ‘गांधी जागर’
सेवांगणचा पुढाकार; सामाजिक प्रश्नांवर होणार मंथन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : गांधी विचारांचे सखोल आकलन आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर मंथन घडवून आणण्यासाठी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला येथील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये ‘गांधी जागर २०२६’ या दोन दिवसीय वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विविध क्षेत्रांतील नामवंत अभ्यासक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दोन दिवसीय सत्रात गांधीजींच्या विचारांचा आजच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात पुनर्विचार केला जाणार आहे. यात डॉ. रुपेश पाटकर (बांदा) हे ‘गांधी विचार आणि मी’ या विषयावर, सचिन परब (पत्रकार) ‘गांधीजींना भावलेले तुकोबा’, प्रा. सुभाष वारे (अहमदनगर) हे ‘गांधीजी आणि समाजवाद’, प्रा. प्रकाश पवार (कोल्हापूर) ‘गांधी आणि जातीव्यवस्था’ या विषयावर, प्रा. आनंद मेणसे (बेळगाव) हे ‘समकालीन वर्तमान आणि गांधी-आंबेडकर विचार’ या विषयावर विश्लेषण करतील.
सद्भावना मंच (पुणे, मुंबई, आजरा), संपत देसाई, सिरत सातपुते, इबनाहिम खान व सहकारी ‘गांधी आणि सामाजिक सद्भावना’ विषयावर चर्चासत्रात सहभागी होतील. यावेळी सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खंडाळेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कमल परुळेकर, ज्योती तोरसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असून जिज्ञासू व विचारप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नाव नोंदणीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.