परीवर्तन---------लोगो
(२२ जानेवारी टुडे २)
चांगले गुण मिळविण्यासाठी
पूजा शाळेजवळच
होळी सणाच्या दरम्यान शाळेत परीक्षेचे वातावरण असे. सर्व मुलांची वार्षिक परीक्षा त्या दरम्यानच असे. श्री आणि त्याची बहीण मराठी शाळेत शिकत होती. वाडीतील इतर सवंगडीही शाळेत होते. परीक्षेत पास होण्यासाठी तसेच चांगले गुण मिळविण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो, याचे भान कोणालाच नव्हते. तुटपुंजा अभ्यास करुनही श्री पास व्हायचा. त्याचा वर्गात पाहिला नंबरही यायचा. इतर मुलांच्या मानाने याचा अभ्यास बरा होता आणि बाबांचेही त्याच्या अभ्यासाकडे लक्ष असायचे. बाबांचे शिक्षण यथातथाच होते, तरीही आपल्या मुलानी भरपूर अभ्यास करावा भरपूर गुण मिळवावे असे त्याना वाटत होते. मुले फार अभ्यास करत नव्हतीच. मग देवाची पूजा करून गुण मिळू शकतात असे श्री आणि त्याच्या बहिणीला वाटे. वाडीतील मुलेही बरोबर होतीच. मार्क मिळविण्यासाठी पूजा शाळेजवळच करायची असे ठरले. पूजेमधे ठराविक मुलानाच सामील केले जाई. शाळेजवळ एक देवचाफयाचे झाड होते. या झाडावर देवाची पूजा करायचा निर्णय श्रीच्या बहिणीने घेतला.
- rat२८p५.jpg-
P26O20483
- डॉं. शरद प्रभूदेसाई
-----
शिमग्यात पालखी नाचविण्याचा कार्यक्रम दोन तास चाले. त्यानंतर पालखी देवळाजवळील सहाणेवर ठेवीत. सहाण म्हणजे जांभ्या दगडाने बांधलेला चौकोनी चौथरा. त्यावर पालखी ठेवीत म्हणून या सहाणेला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करत. हे सहाणीचे पावित्र्य श्रीही पाळत असे. पालखी सहाणेवर ठेवल्यावर होळीसाठी खड्डा खणत. तो खणण्याचा मान प्रमुख गावकाराचा असे. अर्थात बाकीचे त्याला मदत करत. मग खोताच्या परवानगीने होळी उभी करीत. ही होळी गुढीपाडव्यापर्यंत उभी ठेवत. या होळीच्या जवळच आंब्याची फांदी पुरुन त्याचे सभोवती गवत रचून खोताच्या हस्ते ती जाळण्यात येई. ती जाळताना त्यात नारळ टाकीत. हा नारळ अर्धवट जळला की बाहेर काढून त्याची खिरापत करीत. खिरापत खाण्याचा पहिला मान खोताचा असे. थोडक्यात श्रीला सर्वात आधी खिरापत मिळे. त्याला ती फार आवडायची. देवाचा महिमाही अफाट आहे असेही त्याचे मत झाले. देवाच्या गोष्टी करण्यात आपण कोणतीही कसूर करता नये. त्याबाबत कोणतीही टंगळमंगळ करणे योग्य नाही. तसे केल्यास देव शिक्षा देतो, असे त्याच्या मनाने घेतले. अनेक वाडकरी गाऱ्हाण्याद्वारे देवाला नवस करत. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला साकडे घालत. इच्छा पूर्ण झाली की पुढील वर्षी बोललेला नवस फेडत.
शिमग्याच्या दरम्यान पालखी खूण काढायची. एखाद्याच्या शेतात किंवा आवारात ‘नारळ आणि विडा’ लपवून ठेवत. याला खूण म्हणत. मग अशी खूण शोधून काढण्याचे आवाहन पालखीला गाऱ्हाणे घालून करण्यात येई. पालखी त्या शेतात वाडकरी नेत. वाडकरी पालखीला वाहत. या ठीकाणी खूण लपवलेली असे तेथे पालखी जड होते असे पालखी वाहणारे सांगत. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी वाडकरी किंवा कोणीही पालखीला खूण घाली. पालखीने खूण शोधून काढली म्हणजे मनोकामना पूर्ण होणार असे मानले जाई, असे खूण शोधून काढणे श्रीने अनेक वेळा पाहिले होते. पालखी खूणा काढणार असे समजले की श्री पालखीबरोबर जाई. देवाने खूण शोधणे याबाबत त्याला बरेच कुतूहल होते. बाबांसह वाडकऱ्याना तो या खुणेबाबत नाना प्रश्न विचारी. खूण काढताना आपण पालखीला खांदा द्यावा असे त्याला वाटे. पण तो लहान असल्याने त्याची मागणी मान्य होत नसे. त्यामुळे पालखी जड होते का हे तो प्रत्यक्ष अजमावू शकला नाही. कुतूहल मनातच राहिले. पण ‘खूणा काढणे’ याबाबत आकर्षण कायम राहिले. पुढे श्री शिक्षणासाठी मुंबईला गेला, तेव्हा या सर्व गोष्टीना आपण मुकणार याबाबत त्याला हळहळ वाटत असे.
एकदा मार्क मिळविण्यासाठी पूजा देवचाफयाचे झाडावर देवाची पूजा करायचा निर्णय श्रीच्या बहिणीने घेतला. त्या झाडाजवळच एका छोट्या दगडाचा बहिणीने शोध घेतला. या दगडाला सोंडेचा आकार होता. बहिणीला तो गणपतीसारखा वाटला. तो तिने सर्वाना दाखवला. त्यावरील सोंडही दाखवली. त्यानाही तो गणपतीच्या आकाराचाच वाटला. बहिणीची कल्पना सर्वाना मान्य झाली. दगडाला चांगला धुण्यात आला. घरुन निघताना बहिणीने पूजेचे सामान (फुले, गंध, नैवेद्य आणि उदबत्ती) घेतले होतेच. यातील बाबाना आणि आईला काहीच सांगितले नव्हते. या देवाची स्थापना देवचाफ्याच्या झाडावर करण्यात आली. गंधफुलानी पूजा केली. पाच वेळा उदबत्ती ओवाळली. मग गुळाचा नैवेद्य दाखवला जाई. गुळ मिळाला नाही तर रातांब्याचा नैवेद्य दाखविला जाई. देवाचा प्रसाद सर्वजण भक्षण करीत. सर्वांचा नमस्कार करुन झाल्यावर देवाला जवळच्याच रातांबीच्या झाडाखाली पुढील वर्षी सहज मिळेल अशाप्रकारे ठेवले जाई.
अशा प्रकारे पूजा दरवर्षी केल्याने श्रीचा आणि बहिणीचा पहिला नंबर येत असे. अर्थात यांच्यापेक्षा वर्गातील इतर मुलांचा अभ्यास अतिसामान्य असे. खरे तर हीच देवाची कृपा असावी. दरवर्षी वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर असाच देवपूजेचा कार्यक्रम होत असे. सातवी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी बहीण मुंबईला गेली. त्यावेळी पूजेचा कार्यक्रम चालू ठेवाण्याबाबत श्रीला बजावून गेली. त्यावेळी तिने ‘मानला तर देव नाही तर दगड’ हा सुविचार श्रीला सांगितला होता. श्रीनेही तो मुंबईला जाईपर्यंत दोनवर्ष चाफ्यावरील देवाची पूजा चालू ठेवली होती. त्यानंतर मात्र देवपूजेचा कार्यक्रम बंद पडला. ही देवपूजा बंद पाडल्याने आता आपले कसे होणार असे बहिणीला आणि श्रीला वाटले. परीक्षेत मार्क मिळणार का? अशी भीतीही वाटली. सुदैवाने श्रीला मुंबईच्या शाळेत चांगले गुण मिळत होते.
----
(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)