swt2825.jpg
20521
अजित पवार यांच्यासमवेत अर्चना घारे-परब (संग्रहीत छायाचित्र)
दादा; एक न संपणारी उणीव
- अर्चना घारे-परब, कोकण अध्यक्ष, महिला राष्ट्रवादी (शरद पवार गट)
दादा हे केवळ एक व्यक्तिनाम नव्हते, तर असंख्य लोकांचा विश्वास होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे दूरदृष्टीपूर्ण स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांच्या भावना, व्यथा व अडचणी त्यांना मनापासून कळत असत. म्हणूनच ते केवळ मोठे नेते नव्हते, तर सर्वसामान्यांचे लाडके दादा होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करण्याची संधी मला दादांमुळे मिळाली. त्या काळात त्यांची शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिका जवळून अनुभवता आली. चुकीच्या गोष्टींना कधीही थारा न देणारे आणि योग्य निर्णयांसाठी ठाम उभे राहणारे नेतृत्व म्हणजे दादा होते. सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. महिलांप्रती असलेला त्यांचा आदर त्यांच्या प्रत्येक वागणुकीतून दिसून यायचा. कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने, कधी रोखठोक संवाद साधणारे दादा; मात्र महिलांशी बोलताना कधीही शब्दांची मर्यादा न ओलांडणारे, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण होते.
सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण व सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना विशेष जिव्हाळ्याचे होते. काजू उत्पादकांना योग्य दर मिळावा, जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे, तसेच शेतीशी संबंधित विविध प्रश्न विधानभवनात ठामपणे मांडण्यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास मी कधीही विसरू शकत नाही. बँकेसाठी विकसित केलेल्या नव्या अॅपचे त्यांनी केलेले मनापासून कौतुक आजही आठवते. ''तू इंजिनिअर आहेस, तुझ्या ज्ञानाचा उपयोग बँकेसाठी झाला पाहिजे,'' असे सांगत त्यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
नुकताच काही दिवसांपूर्वी दादांशी संपर्क झाला होता. त्यांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भेटण्याची वेळ दिली होती. अशा असंख्य आठवणी आजही मनात जिवंत आहेत. दादांसारखा नेता पुन्हा होणे खरोखरच दुर्मीळ आहे. इतक्यात दादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्यासाठी ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.