प्रचार पुन्हा सुरू; पण उत्साह कमी
चिपळुणात युती व राष्ट्रवादीत लढत ; डिजिटल पोस्टही थंडावल्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने त्याचा प्रचारावर परिणाम झाला होता. दोन दिवस थांबलेला प्रचार पुन्हा सुरू झाला; मात्र तालुक्यातील प्रचारात आता जोश राहिलेला नाही. बहुतांशी ठिकाणी गाजावाजा न करताच शांततेत प्रचाराला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप युती व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी २८ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांशी गटात तिरंगी लढत होत आहेत. शिवसेना भाजपची युती असून, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर ठाकरेसेनेने देखील बहुतांशी गटात उमेदवार दिले आहेत. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्र्याची चिपळुणातील सभा रद्द झाली होती. गेले तीन दिवस प्रचाराची मोहीम थंडावली होती; मात्र उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा दमाने प्रचारास सुरुवात केली आहे; मात्र नेहमी सोशल मीडियावर झळकणाऱ्या प्रचाराच्या पोस्ट थंडावल्या आहेत. तालुक्यातील सावर्डे, शिरगांव, उमरोली, खेर्डी तसेच रामपूर जिल्हा परिषद गटात चुरशीच्या लढती होत आहेत. आमदार शेखर निकम यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर उमेदवारांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. उमेदवारांना जिथे अडचण वाटते तिथे त्या सोडवण्यासाठी ते सातत्याने अग्रेसर राहिले आहेत.
--------
चौकट
दोन गणात ठाकरे सेनेची भूमिका महत्त्वपूर्ण
गेल्या १५ ते २० वर्षात पंचायत समितीला भाजपचा उमेदवार विजयी झालेला नाही. भाजपनेते प्रशांत यादव यांनी युतीच्या तडजोडीत पंचायत समितीसाठी ७ आणि जिल्हा परिषदेला ३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप, शिवसेनेचे किती उमेदवार बाजी मारतात, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. ठाकरे गटाने दोन पंचायत समिती गणात उमेदवार दिलेले नाहीत. तेथील कार्यकर्त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.