rat2p27.jpg
21565
रत्नागिरी ः सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी.
---------------
ऑपरेशन सिंदूरमध्ये तटरक्षक दलाची महत्त्वाची भूमिका
सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण; सागरी सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी कटिबद्ध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : स्थापनेपासून आजपर्यंत तटरक्षक दलाने ११ हजार ८२१ प्राण वाचवले आहेत. ५४ हजार ४३७ रुपयांचे प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केले आहेत त्याशिवाय अनेक सागरी प्रदूषण प्रतिबंधात्मक व विलुप्तप्राय सागरी जीवांच्या तस्करीच्या विरोधी अनेक कारवाया केल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्येदेखील तटरक्षक दलाने महत्वाची भूमिका बजाविली आहे, असे प्रतिपादन भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट शैलेश गुप्ता यांनी केले.
भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवी (५०व्या) वर्धापनदिनानिमित्त आयसीजीएस रत्नागिरीतर्फे रविवारी (ता. १) एका विशेष स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी दलाने दिलेल्या पाच दशकांच्या समर्पित सेवेचे प्रतीक म्हणून हा सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी रत्नागिरीतील विविध तटरक्षक दलाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसह रत्नागिरीचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, तटरक्षक वायू अवस्थानचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी टी. एन. उपाध्याय, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आदी उपस्थित होते.
१९७७ मधील स्थापनेपासून तटरक्षक दलाचा देदिप्यमान वारसा साजरा करणे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणेतील विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील नागरी प्रशासन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ''सागराचे रक्षक''आणि स्थानिक जनता यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट शैलेश गुप्ता यांनी तटरक्षक दलाचे एका जागतिक दर्जाच्या सागरीदलात झालेल्या रूपांतराचा आढावा घेतला. ते म्हणाले, आज येथे उपस्थित असलेले जिल्हा प्रशासन आणि स्थानिक मान्यवर आमची सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक समन्वयाचे प्रतीक आहेत. भारतीय तटरक्षक दलाची आजमितीस देशभरात ४२ अवस्थाने, १६ जिल्हा मुख्यालये, १३ वायू एनक्लेव आणि २ वायू अवस्थान असून, १५५ जहाजे, ८० हवाई साधने आणि १४ होवरक्राफ्ट आहेत.
हे स्नेहसंमेलन म्हणजे महिनाभर भारतीय तटरक्षक रत्नागिरीतर्फे राबवण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांचा समारोप होता. सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी स्थानिक मच्छीमार समुदायाशी संवाद साधणारा ‘कम्युनिटी इंटरॲक्शन प्रोग्राम’, ५० रायडर्सचा समावेश असलेली गुहागरपर्यंतची दुचाकी रॅली, विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्याने आणि तरुणपिढीला सागरीक्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी आयोजित चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.