कोकण

दापोली-मच्छीमारांनी कमवायचं काय आणि खायचं काय

CD

21845

rat3p25.jpg
21812
हर्णै ः मासळी दुष्काळामुळे हर्णै बंदरामध्ये उभ्या असलेल्या मासेमारी नौका.
-rat3p24.jpg-
21811
दापोली ः मासळी नसल्याने उटंबर खाडीत उभ्या असलेल्या नौका.
------------
हर्णैच्या समुद्रात मत्स्य दुष्काळ
मासळी व्यवसाय संकटात; अर्ध्याहून अधिक नौका किनाऱ्यावर, मच्छीमारांसह व्यावसायिकांना मोठा फटका
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३ः कोकणच्या समुद्रावर अवलंबून असलेला हर्णै बंदरातील मासळी व्यवसाय सध्या गंभीर संकटात सापडला आहे. गेले दोन महिने मासळीची आवक सतत घटत चालल्याने मच्छीमार हतबल झाले असून, अनेक नौकांनी थेट समुद्राकडे पाठ फिरवली आहे. सकाळी व संध्याकाळी चालणारा जोरदार लिलाव आता पटकन आटपत आहे. ‘मिळेल तेवढी मासळी आणि निभावला तर खर्च’ अशी अवस्था झाली असून कमवायचं काय आणि खायचं काय? हा प्रश्न मच्छीमार कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. हंगामाचे अजून चार महिने शिल्लक असताना हर्णै समुद्रात मासळीअभावी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास हर्णै बंदरातील मासळी व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.
१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला सुरवातीला चांगले दिवस आले होते. मध्येच दोन-तीन वादळांचा फटका बसला असला तरी गणपतीनंतर हंगाम पुन्हा जोरात सुरू झाला होता. नोव्हेंबरपर्यंत मासळी मुबलक मिळत होती. त्या काळात पर्यटकांचीही चंगळ झाली होती; मात्र नोव्हेंबरनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. डिसेंबरपासून मासळीची आवक घटली आणि हीच स्थिती जानेवारीतही कायम राहिली. सुरवातीला म्हाकुल मासळी चांगल्या प्रमाणात मिळत होती; पण दर कमी होते. शेवट शेवट म्हाकुळ मासळीचा दर ४०० रुपये किलो झाला होता; परंतु आता कोणीही ट्रॉलर म्हाकुळ मासळीसाठी जातच नाही. त्यानंतर कोळंबीची आवक बंपर झाली; मात्र आवक वाढताच दर घसरले. आता मासळीच मिळत नसल्याने दर वाढले असले तरी त्याचा फायदा मच्छीमारांना होत नाही.

चौकट
९०० पैकी १०० नौकात समुद्रात मासेमारीसाठी
हर्णै बंदर पंचक्रोशीतील सुमारे ८०० ते ९०० नौका आहेत. त्यापैकी किमान ५०० नौका समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत; परंतु त्यापैकी केवळ १०० नौकाच सध्या मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. उर्वरित नौका मासळीच न मिळाल्याने बंदरात उभ्या आहेत. किमान १०० ट्रॉलर नौका थेट आंजर्ले खाडीत उभ्या आहेत. २५ ते ३० नौका काम नाही म्हणून डागडुजी करून घेऊ, या भूमिकेत किनाऱ्यावरच थांबल्या आहेत; मात्र मासळी मिळत नसल्याने या नौका पुन्हा समुद्रात जातील की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे.

चौकट
कमवायचं काय अन् खायचं काय?
आठ दिवस मासेमारी करूनही केवळ चार ते पाच टप मासळी मिळते. दोन दिवसांपूर्वी एका नौकेला एक टप पापलेट मिळाले, त्याचा लिलाव अवघ्या ६५ हजारांत झाला; मात्र एका फेरीचा खर्चच दीड लाखांच्या आसपास जातो. नोकरांचा आठ दिवसांचा पगार सुमारे ३५ हजार, डिझेल, पाणी, अन्नसामग्री आणि इतर खर्च मिळून मोठा आर्थिक बोजा मच्छीमारांवर पडत आहे.

चौकट
कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर
नुकसान वाढत चालल्याने अनेक नौकामालकांनी मासेमारी उद्योग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी कामगारांना उतरवून त्यांचा हिशोबही करून दिला आहे. परिणामी, रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ट्रॉलर नौकांसोबतच दररोज ताजी मासळी आणणाऱ्या छोट्या फायबर नौकांनाही फटका बसला असून, किमान ५० ते ६० फायबर नौकांनी मासेमारी थांबवली आहे.

चौकट
एलईडी, मलपी नौकांच्या मासेमारीकडे शासनाचे दुर्लक्ष
या परिस्थितीला कारणीभूत ठरणारी मुख्य बाब म्हणजे हर्णै बंदरासमोर सुरू असलेली एलईडी व मलपी फास्टर नौकांची अवैध मासेमारी, असा आरोप मच्छीमारांकडून होत आहे. या नौका पारंपरिक मच्छीमारांच्या हद्दीत बिनधास्त मासेमारी करत असल्याने त्यांच्या जाळ्यात मासळीच येत नाही. लोकप्रतिनिधी आणि शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी मच्छीमारांमध्ये आहे.

कोट
गेले दोन महिने समुद्रात जाऊनही हातात काहीच लागत नाही. आठ–आठ दिवस मासेमारी करून खर्चही निघत नाही उलट कर्ज वाढत चाललं आहे. डिझेल, नोकरांचा पगार, जेवणाचा खर्च सगळं करून लाखभर खर्च होतो; पण मासळीचा लिलाव ६०–७० हजारातही होत नाही.एलईडी आणि मलपी फास्टर नौकांची अवैध मासेमारी सुरू आहे. यावर शासन किंवा लोकप्रतिनिधी काहीच कार्यवाही करत नाहीत. म्हणूनच येथील मच्छीमारांनी नौका आंजर्ले खाडीत ठेवून उद्योग बंद केला आहे. पुढचे चार महिने कुटुंब चालवायचं कसं? हा मोठा प्रश्न त्या मच्छीमारांसमोर आहे.
- नारायण रघुवीर, मच्छीमार, हर्णै

कोट
आमच्यासाठी समुद्र हाच उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. पण सध्या समुद्रात मासळीच नाही, अशी अवस्था आहे. मासळी मिळत नसल्याने कामगारांना घरी बसवावं लागलं, त्यांचा पगार द्यायलाही हात आखडता घ्यावा लागतो. अवैध मासेमारीवर जर वेळीच बंदी घातली नाही, तर पारंपरिक मच्छिमार पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. शासनाने तातडीने कारवाई करून आम्हाला दिलासा द्यावा, नाहीतर हा व्यवसाय टिकवणं अशक्य होईल.
- अनंत चोगले, मच्छीमार, हर्णै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर महागला! घरगुती ६० रुपयांनी तर कमर्शियल ११५ रुपयांनी वाढ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT