कोकण

डावपेच, छुप्या कारस्थानांना ऊत

CD

22282

डावपेच, छुप्या कारस्थानांना ऊत
दोडामार्ग तालुका : अनुभवी नेत्यांना नवख्यांचे आव्हान
संदेश देसाई ः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर, ती राजकीय अस्तित्व, वर्चस्व आणि आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई बनली आहे. ग्रामीण भागातील जनमत, स्थानिक प्रश्नांवरील नेत्यांची पकड आणि पक्षांची संघटनात्मक ताकद यांची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. या लढाईने बंडखोरी, अंतर्गत डावपेच आणि छुप्या कारस्थानांनी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून टाकले आहे.
तालुक्यात अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या अनुभवी, धुरंदर नेत्यांसाठी ही निवडणूक आपली राजकीय कारकीर्द टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सत्वपरीक्षा घेत आहे. त्यांच्यावर बदलत्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात जनतेचा विश्वास अजूनही आपल्याकडे आहे का, याचा थेट निकाल या निवडणुकीतून समोर येणार आहे. त्यामुळे अस्तित्व पणाला लागलेले हे नेते स्वतः प्रचारात उतरून प्रत्येक प्रभागावर बारीक लक्ष ठेवताना दिसत आहेत. या लढतीच्या निमित्ताने राजकीय भवितव्यात नव्याने पाय रोवलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी प्राप्त झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते, तरुण नेतृत्व, शेतकरी संघटना आणि ग्रामपातळीवर काम करणारे कार्यक्षम चेहरे यावेळी पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर येताना दिसत आहेत. आता मतदार परंपरागत राजकारणालाच स्वीकारतील की, नव्या चेहऱ्यांना उभारी देतील, याची उत्सुकता आहे. एकंदरीत नवख्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत असला तरी तालुक्यात अनेक वर्षे राजकीय पटलावर खेळत असलेल्या दिग्गजांसमोर तग धरतील का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

* बंडखोरीने छुपे डावपेच
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे बंडखोरी. उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराज नेत्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. वरवर पक्ष एकसंघ दिसत असले, तरी आतल्या आत अंतर्गत डावपेचांचे छुपे कारस्थान सुरू असल्याची चर्चा आहे. गटांतर्गत संघर्ष, स्थानिक नेत्यांमधील वर्चस्वाची चढाओढ आणि वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे काही प्रभागांतील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. याचा फटका थेट पक्षांच्या मतविभागणीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* विकासकामे प्रचाराच्या केंद्रस्थानी
तालुक्यातील मतदार यावेळी केवळ पक्षनिष्ठेवर मतदान करणार नाहीत, अशी स्पष्ट भावना दिसून येते. आपले प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती कायम संपर्कात असणारी हवी, प्रश्न सोडवणारा प्रतिनिधी हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांना केवळ घोषणा नव्हे, तर ठोस कामाचा लेखाजोखा मांडावा लागत आहे.

* राजकारणाची दिशा ठरेल
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही अनुभव विरुद्ध नवे आश्वासक चेहरे, संघटना विरुद्ध बंडखोरी आणि प्रतिष्ठा विरुद्ध जनमत अशी बनली आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक सत्तेचे गणित बदलणार नाही, तर तालुक्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल.

* माटणे सर्वाधिक लक्षवेधी
जिल्हा परिषद माटणे मतदारसंघ हा दोडामार्ग तालुक्यातील केंद्रस्थानी बनला आहे. या मतदारसंघातून यापूर्वी तालुक्याच्या राजकारणातील दिग्गज नेते बाबुराव धुरी, राजेंद्र म्हापसेकर आणि राजेंद्र निंबाळकर यांनी राजकीय डाव खेळले. राजकीय खेळीत मातब्बर असलेले निंबाळकर यांनी यावेळी मात्र आरक्षण खुले असतानाही रणांगणातून माघार घेतली; मात्र, मागील दोन निवडणुकीत म्हापसेकर यांनी बाजी मारली असली तरी यावेळी येथून युतीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून दीपक गवस हा नवखा चेहरा पुढे आला आहे. ज्यांनी दोनवेळा रणांगण गाजवले, ते भाजपाचे नेते म्हापसेकर हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. या मतदारसंघावर पकड धरून असलेल्या धुरी यांनी मशालीच्या चिन्हावर दंड थोपटले आहेत. मागील दोनवेळच्या पराभवाचे शल्य उरी असलेले धुरी आता विजयासाठी कोणता डावपेच खेळतात, याची उत्सुकता आहे. यातच टोकाचे शीतयुद्ध चालू आहे, ते महायुतीतील नवख्या व सर्व परिचित असलेल्या दोन चेहऱ्यांत. युतीचे अधिकृत गवस यांना पक्षीय पाठबळ लाभत असून म्हापसेकर स्वबळावर ताकद आजमावत आहेत.

* कोनाळमध्ये प्रतिष्ठा पणाला
राजकारणात बुद्धीचे डावपेच खेळण्यात धुरंदर म्हणून ओळखले जाणारे निंबाळकर यांनी माटणेमधून स्वतः निवडणूक लढविण्यापासून माघार घेतली असली तरी कोनाळ पंचायत समितीमधून आपल्या घरातील उमेदवार उभा केला आहे. सायली निंबाळकर यांना युतीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून साक्षी देसाई उभ्या ठाकल्या आहेत. सरपंच असताना देसाई यांनी हेवाळे गावच्या विकासाला गती देत कर्तबगार सरपंच म्हणून तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. निंबाळकर या राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांना राजकीय पाठबळ आहे.

* मणेरीतही उत्कंठा शिगेला
पंचायत समिती मणेरीमधून युतीची सोनिया कुबल, ठाकरे शिवसेनेची प्रीती धुरी, बहुजन समाज पार्टीचे दीपक जाधव व अपक्ष संजय देसाई हे मैदानात उतरले आहेत. भाजपच्या दोघांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. ठाकरे सेनेच्या प्रीती धुरी यांना जिल्हाप्रमुख धुरी यांचे पाठबळ आहे. यावेळी पत्नीला निवडून आणण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. युतीचे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या सोनिया कुबल यांचे पती भाजप युवा कार्यकर्ते अंकुश उर्फ भैया नाईक यांनी संघटनेच्या बळावर मोर्चेबांधणी केली आहे.

* युतीला आव्हान
जिल्हा परिषद मणेरीमध्ये भाजप-शिवसेना युती असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युतीला आव्हान देण्यासाठी अपक्ष उमेदवार उभा केला आहे. युतीचे उमेदवार साक्षी तळवडेकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुनिता भिसे यांच्यात तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. भाजप नेते एकनाथ नाडकर्णी यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ठाकरे शिवसेनेच्या ललिता ताटे यांनीही आव्हान उभे केले आहे. तालुक्यातील साटेली-भेटशी मतदारसंघातही चुरस पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT