‘अदृश्य शक्ती’ मुळे अपक्ष जोमात
लढती अंतिम टप्प्यात : महायुतीसमोर ठाकरे शिवसेनेसह अपक्षांचे आव्हान
विनोद दळवी : सकाळ वृत्तसंस्था
ओरोस, ता. ५ : जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत असताना ‘अदृश्य शक्ती’च्या पाठबळावर राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केले आहे. तब्बल २८ अपक्ष आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. २६ मतदारसंघांत दुरंगी, १२ मतदारसंघांत तिरंगी, एका मतदारसंघात चौरंगी आणि तीन मतदारसंघांत पंचरंगी लढती होत आहेत. यातील सर्वाधिक लढती भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना आणि त्या पाठोपाठ शिवसेना आणि ठाकरे शिवसेना अशा आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून शनिवारी (ता. ७) मतदान होत आहे. यासाठी ४२ जिल्हा परिषद गटांसाठी आणि ८३ पंचायत समिती गणांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी ५ लाख ६१ हजार १०५ मतदार निश्चित आहेत. ८१० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी ११५ आणि पंचायत समित्यांच्या ८३ जागांसाठी २४४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजप शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांची महायुती आहे, तर ठाकरे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी जात आहे. त्याचबरोबर तब्बल २८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील लढतींचे चित्र पाहिले असता ४२ पैकी सर्वाधिक २६ ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. यामध्ये कोकिसरे, लोरे, कासार्डे, कलमठ, हरकुळ बुद्रुक, नाटळ, कळसुली, पुरळ, कुणकेश्वर, आडवली मालडी, आचरा, मसुरे मर्डे, पेंडुर, वायरी भूतनाथ, आंब्रड, वेताळ बांबर्डे, ओरोस बुद्रुक, नेरुर देऊळवाडा, तेंडोली, घावनळे, उभादांडा, माडखोल, आंबोली, कोलगाव, माजगाव, साटेली भेडशी या मतदारसंघांचा समावेश आहे. तिरंगी लढत होत असलेल्या मतदारसंघात फोंडा, सुकळवाड, पिंगुळी, माणगाव, म्हापण, आडेली, तुळस, तळवडे, इन्सुली, मळेवाड, आरोंदा, मणेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पावशी या एकाच मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. शिरगाव, रेडी, माटणे या तीन मतदारसंघात पंचरंगी लढती आहेत.
जिल्हा परिषदेसाठी भाजप विरुद्ध ठाकरे ठाकरे शिवसेना १८ ठिकाणी तर दोन्ही शिवसेना १४ ठिकाणी समोरासमोर लढती आहेत. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना युती असली तरी आंबोली आणि मळेवाड या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार एकमेकांसमोर आहेत. एका ठिकाणी महायुतीच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे. जिल्ह्यात २८ ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात महायुतीच्या विरोधात थेट सहा ठिकाणी अपक्ष आहेत. ठाकरे शिवसेना उमेदवाराच्या थेट विरोधात दोन ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवित आहेत. दिग्गज अपक्षांना अदृश्य राजकीय शक्तींकडून रसद पुरविली जात असल्याचा आरोप युतीच्या नेत्यांनी केला आहे. याची प्रचीतीही प्रचारात आली. काही उमेदवारांकडून बऱ्यापैकी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या उमेदवारांना त्या भागातील संबंधित पक्षाचे कार्यकर्ते उघड मदत करताना दिसत आहेत. आर्थिक रसदही पुरविली जात असल्याचे चित्र आहे. याचा निकालावर किती प्रभाव पडणार, याची उत्सुकता आहे.
चौकट
अदृश्य शक्ती आहे तरी कोण?
जिल्ह्यात शिवसेना भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांची महायुती निवडणूक लढवित आहे, परंतु महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत महायुती विरोधात अदृश्य शक्ती काम करीत आहे. ही अदृश्य शक्ती अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी रसद पुरवित असल्याचा आरोप केला जात आहे. खुद्द पालकमंत्री नीतेश राणे यांनी याबाबत जाहीर सभेत वक्तव्य केले आहे. सर्व शक्तिस्थाने असलेल्या महायुतीच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करीत असल्याचा आरोप महायुतीचे नेते करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ही अदृश्य शक्ती कोण आहे, त्याचे नाव जाहीर करावे, अशी चर्चा सुरू आहे.
कोष्टक
मतदान केंद्र*संख्या
तालुका*केंद्र*मतदारसंघ*उमेदवार
वैभववाडी*५८*२/५*५/२४
कणकवली*११८*६/१०*१५/३२
देवगड*८२*३/८*१३/२२
मालवण*१११*६/११*१३/२९
कुडाळ*१५३*९/१८*२३/४५
वेंगुर्ले*८७*५/९*१६/२७
सावंतवाडी*१४३*८/९*२१/५५
दोडामार्ग*५८*३/५*१०/२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.