गोळप गटात भाजपने पाळला युतीचा धर्म
उदय बने यांना पराभवाचा दणका ; ठाकरेसेनेला धोबीपछाड
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गोळप गटात भाजपने युतीचा धर्म पाळल्याने महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करून विजयाचा जल्लोष केला.
पावस व गोळप गटामध्ये पारंपरिक शिवसेना-भाजप युती कार्यरत होती; परंतु अंतर्गत मतभेदामुळे २०१७ च्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरूद्ध भाजप अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. शिवसेनेला आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची साथ मिळाल्यामुळे या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिंदे गट व भाजप यांची महायुती झाली. या दोन्ही गटांमध्ये महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली. या दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती; परंतु युतीचा धर्म पाळून त्यांनी मतदान केले. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. ही आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे.
गोळप गटामध्ये २०१७ च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्या वेळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यामध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे या गटातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये पारंपरिक शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे; परंतु २०२२ मध्ये झालेल्या फुटीमध्ये यातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती. त्या दृष्टीने निवडणुकीमध्ये हालचालींना वेग आला होता. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ठाकरे सेनेकडून मोठ्या प्रमाणात व्यूहरचना करण्यात आली.
या गटामध्ये शिंदेसनेकडून विभागप्रमुख नंदकुमार मुरकर यांना उतरवण्यात आले. गेली दहा वर्षे फणसोप ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवून गेली पाच वर्षे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी अर्ज दाखल केला होता. सलग २५ वर्ष जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले होते. ही त्यांची शेवटची निवडणूक होती. त्यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यामुळे या गटांमध्ये रंगत वाढली होती. अटीतटीच्या लढतीत नंदकुमार मुरकर यांनी बने यांचा पराभव केला तसेच भाट्ये गणातून अर्चना तुषार साळवी तर गोळप गणातून नेताजी पाटील यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.
कोट
गेली २५ वर्षे मी शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. या वेळेला अपक्ष उमेदवारी दाखल करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजचा पराभव मान्य आहे; परंतु आजही या गटांमध्ये पाच हजारापेक्षा जास्त मतदार माझ्या पाठीशी आहेत, हे या निमित्ताने सिद्ध झाले.
- उदय बने, गोळप गट, पराभूत अपक्ष उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.