राजापूर तालुका वार्तापत्र---लोगो
ठाकरे सेना, काँग्रेसची वाटचाल कठीण
शिंदेसेनेचे एकहाती वर्चस्व; आता विकासाची अपेक्षा
इंट्रो
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकहाती वर्चस्व राखत शिवसेनेने राजापुरातील गेल्या दोन दशकातील निर्विवाद वर्चस्वाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर विकासकामे करत सर्वसामान्यांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवणारे शिवसेनेचे आमदार किरण सामंत या निवडणूक निकालाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरले आहेत; मात्र एकाही जागेवर विजय न मिळवणाऱ्या ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसला भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने आत्मचिंतन करावे लागणार आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
-----------------------
तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, काँग्रेस, मनसे या प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी शिंदे शिवसेना विरूद्ध ठाकरे शिवसेना अशी खरी लढत झाली. त्यामध्ये शिवसेनेने तालुक्याच्या राजकारणातील आपली ताकद अधिक मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले होते तर, ठाकरे शिवसेनेसमोर या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवण्याचे आव्हान होते. ठाकरे शिवसेना पक्षाला मिळालेले अपयश त्यांच्या भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने चिंताजनक म्हणावे लागेल. माजी आमदार गणपत कदम, समन्वयक रवींद्र डोळस, अनिल भोवड आदींच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना दोन नंबरची मिळालेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. दुसऱ्या बाजूला काही वर्षापूर्वी राजापूरच्या राजकारणातील नंबर एक असलेल्या काँग्रेसची ग्रामीण भागातील राजकीय ताकद कमी होत असल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले आहे. केंद्र आणि राज्यातील विरोधी गटातील या दोन्ही मित्रपक्षांना पुन्हा उभारी घ्यायची असेल तरी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यश खेचून आणावे लागेल. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका असोत वा जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका यामध्ये राजापूरच्या जनतेने शिवसेना-भाजपा महायुतीच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे राजापूरवासियांना आता महायुतीकडून राजापूरच्या नियोजनबद्ध विकासात्मक कायापालटाची अपेक्षा राहणार आहे.
चौकट
अनेक वर्षांनी कमळही फुलले
केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी असूनही राजापूरमध्ये भाजपला म्हणावे तितकेसे अपेक्षित यश मिळालेले नाही. ग्रामीण भागामध्ये संघटनात्मक ताकद असली तरी त्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यामध्ये रूपांतर झालेले नाही. असे असताना या वेळी धोपेश्वर गणातून विजयी झालेले भाजपचे अभिजित गुरव यांच्या माध्यमातून भाजपचे पंचायत समितीमध्ये सुमारे दीड-दोन दशकानंतर कमळ फुलले आहे. भाजपसाठी ही आनंददायी बाब असून, भविष्यातील राजकारणासह संघटनात्मक बळकटी देणारी ठरणार आहे.
चौकट
दोन अपक्षांनी दाखवली ताकद
शिदे शिवसेना विरूद्ध ठाकरे शिवसेना अशा झालेल्या लढतीमध्ये अपक्षांनीही दाखवलेली ताकद लक्षवेधी ठरली आहे. धोपेश्वर गणामध्ये झालेल्या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांचा २५१ मतांनी पराभव झाला. नाटे गणामध्ये रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार नंदिनी कदम यांनी विजय खेचून आणला. त्यांच्या माध्यमातून राजापूर पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवाराचा प्रवेश झाला आहे. नवनिर्वाचित सदस्य नंदिनी कदम यांचा शिवसेनेला पाठिंबा मिळणार असल्याने त्याच्यातून शिवसेनेची पंचायत समितीमध्ये ताकद अधिकच वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.