ग्राउंड रिपोर्ट - लोगो
rat13p18.JPG
O24296
राजापूर ः अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळून सातत्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. (संग्रहित)
rat13p19.jpg-
O24297
राजापूर ः दरड कोसळल्यानंतर वाहनांना मार्ग मोकळा करून देताना पोलिसांचीही कसरत होते. (संग्रहित)
rat13p20.jpg-
24298
राजापूर ः याच पायवाटेवरून काजिर्डा घाटरस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे.
काजिर्डा घाटरस्ता सर्वेक्षणाला चालना
एक कोटीची तरतूद; कोल्हापूर येणार अधिक जवळ, ३५ किमीची बचत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील काजिर्डा घाटरस्ता गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी अन्य मार्गांना पर्यायी मार्ग असलेला काजिर्डा घाटातील हा रस्ता व्हावा म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून काजिर्डा येथील ग्रामस्थांसह समाजधुरिणींकडून प्रयत्न केले गेले; मात्र, त्याला यश आले नव्हते. आता काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. घाटरस्त्याच्या निर्मितीसाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या सर्वेक्षणानंतर डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) शासनाला सादर केला जाणार आहे.
चौकट
वैशिष्ट्यपूर्ण काजिर्डा गाव
सुमारे तेराशे लोकवस्ती असलेला काजिर्डा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला आहे. शेकडो फुटावरून अविरतपणे बारमाही वाहणाऱ्या धबधब्यामुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणणारा काजिर्डा धरण प्रकल्पही या ठिकाणी उभारला जात आहे. काजिर्डा गावाचा राजापूर तालुक्यामध्ये समावेश असला तरी, घाटमाथा परिसर तालुक्यातील अन्य गावांच्या तुलनेमध्ये अधिक जवळ आहे.
चौकट
३५ किमी अंतर वाचते
काजिर्डा घाटातून जाणारा घाटरस्ता राजापूर - पाचल - मूर - काजिर्डा - पडसाळी - भोगाव करत पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जातो. अणुस्कुरा घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या तुलनेमध्ये काजिर्डा घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे सुमारे तीस - पस्तीस किमीचे अंतर वाचते. वेळेसह खर्चाचीही बचत करणारा हा रस्ता राजापूर ते काजिर्ड्यापर्यंत झालेला आहे. पुढे पडसाळी ते भोगाव - कोल्हापूर असा झालेला आहे; मात्र, या दोन्हींच्या मध्ये असलेला घाटातील काजिर्डा ते पडसाळी हा सुमारे साडेतीन किमीचा रस्ता झालेला नाही. त्याचा ग्रामस्थांकडून पायवाट म्हणून उपयोग केला जातो.
चौकट
बैलावरून वाहतूक बंद झाली
घाटमाथ्यावरील अनेक व्यापारी शेतमालासह अन्य विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यासाठी येत असत. त्या काळामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या मालाची वाहतूक बैलांवरून ओझी वाहून केली जात होती. मालवाहतूक करणारे हे बैल काजिर्डा घाटातून कोकणामध्ये म्हणजे घाटाच्या पायथ्याशी येत असत. कालपरत्वे मालवाहतूक करणारे बैल या मार्गातून येणे बंद झाले असले तरी, काजिर्डावासियांकडून घाटमाथ्यावर जाण्यासाठी घाटातील या रस्त्याला प्राधान्य दिले जात आहे.
चौकट
श्रमदानातून घाटरस्ता
दळणवळणासह वाहतुकीसाठी सुरक्षित आणि वेळेसह पैशाची बचत करणारा काजिर्डा घाटरस्ता व्हावा, अशी गेल्या कित्येक वर्षापासून काजिर्डा ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र, साऱ्यांकडून दुर्लक्षित राहिल्याने अखेर येथील ग्रामस्थांनी तीन वर्षापूर्वी श्रमदानातून घाटरस्ता केला. त्यामुळे काजिर्डा घाटरस्ता वाहतुकीसाठी काही प्रमाणात मोकळा झाला आहे.
चौकट
पर्यटनालाही चालना शक्य
काजिर्डा घाटमार्ग रस्त्याबाबत शासनदरबारी चर्चा होऊन शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. काजिर्डा घाटमार्ग राजापूर - ओणी - रायपाटण - पाचल - तळवडे - मूर - काजिर्डा - पडसाळी - बाजारभोगाव - कळे - कोल्हापूर असा मार्ग असणार आहे. यामुळे सुमारे ६० गावांना कोल्हापूरशी संपर्काच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. या प्रवासामध्ये घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या घाटमार्गामुळे या परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
चौकट
सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात
घाटरस्त्याच्या निर्मितीसाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी घाटमार्गाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदार नियुक्त केला आहे. सुमारे आठ किमी घाटमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जामदा प्रकल्पामुळे प्रस्तावित काजिर्डा घाटमार्ग गावाबाहेरून काढला जाणार आहे. घाटमार्ग सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
कोट
अणुस्कुरा घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने कोसळणार्या दरडींमुळे धोकादायक झाला आहे. दरड कोसळून रस्त्यामध्ये माती आणि दगड येऊन रस्ता बंद झाल्यास सद्यःस्थितीमध्ये त्याला पर्यायी मार्ग नाही. अशा स्थितीमध्ये काजिर्डा घाटरस्ता झाल्यास वाहतुकीसाठी नवा एक पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याचे लवकरात लवकर सर्वेक्षण होऊन घाटमार्ग उभारणीच्या प्रत्यक्ष कामालाही सुरवात व्हावी.
- अमोल गुरव, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.