बिग स्टोरी
rat१५p२.jpg-
२४६२८
रत्नागिरी शहरात जयस्तंभ येथे उभारलेले सीसीटीव्ही.
rat१५p३.jpg-
२४६२९
रत्नागिरीतील मांडवी किनारी उभारलेले सीसीटीव्ही.
rat१५p५.jpg-
२४६४०
खेड ः मिशन नेत्रा अंतर्गत बसविलेल्या कॅमेऱ्यांना वेलींचा वेढा पडला आहे. खेड शहरातील अनेक कॅमेरे बंद आहेत.
rat१५p६.jpg-
२४६४१
राजापूर ः जवाहरचौकामध्ये नगर पालिकेने बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा.
-------------
इंट्रो
जिल्ह्यात गुन्हेगारांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर, महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी बारीक नजर ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेबरोबर तिसरा डोळा म्हणून काम करते ती सीटी टिव्ही यंत्रणा. रत्नागिरी, चिपळूण या मोठ्या शहरांना त्यासाठी प्राधान्य दिले आहे. राजापूर, खेड, दापोली, आदी तालुक्यातही महत्त्वाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही आहेत. एकुण साडे तीन हजाराच्यावर सीसीटीव्ही आहेत. त्यामध्ये खासगी सीसीटीव्हींचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नियंत्रण कक्षात राहून शहरं आणि महत्त्वाची ठिकाणं तसेच हालचालींवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे झाले आहे. तिसऱ्या डोळ्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसला, काही गुन्हे तर सीसी टीव्ही फुटेजमुळे उघडकीस आले आहेत. या आधुनिक यंत्रणेमुळे पोलिसदल अधिक सक्षम होत गेले. परंतु या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरूस्तीचा गंभीर प्रश्न आहे. नेमलेल्या एजन्सीकडुन त्याची वेळेवर देखभाल दुरूस्ती केली जात नाही. त्यात रत्नागिरीतील एका कंपनीने सुमारे ४३ लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विविध विकास कामांच्या खोदाईमुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी नजर ठेऊन असलेला या तिसऱ्या डोळ्याची नजर आता धुसर होताना दिसत आहे. ती तेज होण्यासाठी जिल्ह्यात बसविण्यात येणाऱ्या सुमारे ७ ,५०० सीसी टीव्हींचा प्रकल्प लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
- राजेश शेळके, सिद्धेश परशेट्ये, मुझ्झफर खान, राजेंद्र बाईत
--
पोलिसांची तिसरी नजर होतेय धुसर
जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न
गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी आणि शहराच्या अंतर्गत हालचालींचे नियंत्रण कक्षातून मॉनिटरिंग करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यात आले. मात्र, सध्या हे जाळे अनेक ठिकाणी खिळखिळे झाले आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर या सारख्या प्रमुख शहरांमध्ये बसवलेले कोट्यवधी रुपयांचे कॅमेरे आता शोभेच्या वस्तू ठरू नयेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही कॅंमेऱ्याचा प्रयोग करण्यात आला. एचडी, बुलेट आणि एएनपीआर अशा अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे रत्नागिरी शहरामध्ये बसविण्याच्या प्रकल्प सुरू झाला. मुंबई मधील एका कंपनीने याचा ठेका घेतला शहरामध्ये ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सुमारे १ कोटीच्यावर या प्रकल्पावर खर्च करण्यात आले. गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, शहरातील एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट आदी ठिकाणी बारीकसारीक हालचालींवर पोलिसांची नजर राहण्यासाठी ही यंत्रणा उभी केली. राज्यातील औरंगाबाद शहरामध्ये सीसीटीव्हीचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर रत्नागिरी शहरातही प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्हीचा हा प्रकल्प उभारण्यात आला. शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले. मात्र ही यंत्रणा अपूरी ठरत आहे.
---------------
देखभालीचा गंभीर प्रश्न अन् ४३ लाखांचा गंडा
या यंत्रणेच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे देखभाल-दुरुस्तीचा अभाव. ज्या कंपनीवर या कॅमेऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तिनेच पोलिस दलाची सुमारे ४३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असला तरी, यंत्रणा पूर्ववत करण्याबाबत अजूनही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तंत्रज्ञाना अभावी यंत्रणा कोलमडली आहे. ५६ पैकी ५० टक्के कॅमेरे बंद पडल्याने शहरातील बारीकसारीख हालचालीवर लक्ष ठेवणे आता जिकीरीचे झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुरूस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. परंतु त्याला अपेक्षित गती नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात ‘सिटी सर्व्हिलन्स’ प्रकल्पांतर्गत ५६ महत्त्वाचे कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, त्यापैकी तब्बल ५० टक्के (२८ कॅमेरे) सध्या बंद आहेत. मारुती मंदिर, शहराचे मुख्य प्रवेशद्वार आणि महत्त्वाच्या गजबजलेल्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. त्याअनुषंगाने पोलिस दलाने ठोस पावले उचरण्याची गरज आहे.
----------------
समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात?
जिल्ह्यात एकूण ७,५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन केले होते. यामध्ये कोकणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समुद्र किनाऱ्यांचाही समावेश होता. मात्र, सध्याची स्थिती पाहता हे नियोजन केवळ कागदावरच राहणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. समुद्रमार्गे होणारी तस्करी किंवा घुसखोरी रोखण्यासाठी हे कॅमेरे सज्ज असणे अनिवार्य आहे. परंतु हा प्रकल्प अजून कागदावरच असल्याचे चित्र आहे.
...अशी झाली फसवणूक
जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्वाचे ‘रत्नागिरी शहरात पाळत ठेवणारा प्रॉजेक्ट’ ( रत्नागिरी सीटी सर्व्हिलन्स प्रकल्प) चे काम करणे बंधनकारक असताना प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लि. या कंपनीने १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत शासनाची ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. रत्नागिरी जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ कॅमेरे बसवून चालणार नाही, तर त्यांचे नियमित ‘ऑडिट’ आणि देखभाल होणे आवश्यक आहे. विकासकामांच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचे होणारे नुकसान थांबवून, फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करत ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करणे काळाची गरज आहे. अन्यथा, सुरक्षिततेचा हा ‘तिसरा डोळा’ केवळ नावापुरताच उरेल
चौकट
यंत्रणेची गरज का आहे?
१. गुन्हे उघडकीस आणणे: अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमुळेच आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.
२. वाहतूक नियंत्रण: शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी
३. दहशतवाद आणि सुरक्षा: कोकण किनारपट्टी संवेदनशील असल्याने २४ तास देखरेख गरजेची आहे.
--------------
कॅमेऱ्यांची वैशिष्ट्य
* सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिवसा आणि रात्रीही चांगल्या पद्धतीचे रेकॉर्डीग होणारे कॅमेरे आहेत.
* एचडी दर्जाचे, वेगवान वाहनाचे नंबर टिपणारे, बुलेट कॅमेरे आणि मुव्हेबल (इकडे तिकडे फिरणारे) एएनपीआर दर्जाचे हे कॅमेरे आहेत.
* शहरात या कॅमेऱ्यांचे जाळे फिरल्यानंतर गुन्हेगारी, गैरप्रकार आणि बेशिस्त पार्किंगला नक्कीच चाप
* वाहतूक कोंडी होईल, अशी वाहने लागल्यास बिप देणाऱ्या कॅमेऱ्यांचाही यामध्ये समावेश
----------------
तिसऱ्या डोळ्यामुळे १७ गुन्ह्यांची उकल
जिल्ह्यात सीसी टीव्हीचे जाळे पसरल्याचा मोठा फायदा पोलिसांना गुन्हे उघडकीस करण्यात झाला आहे. पोलिस दलाच्या ५७ सीसी टिव्हीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी खासगी लावलेल्या एकूण ३ हजार १२१ सीसी कॅमेरे आहेत. शासकीय विभागाचे ४९९ तर खासगी २ हजार ६२२ सीसी टीव्ही आहेत. तिसऱ्या डोळ्यामुळे वर्षभरात १७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
*एकावर हल्ला करून पळूण जाणाऱ्या गुन्हेगारांनाच पोलिसांनी पाठलाग केला होता. परंतु नंबर प्लेटला चिखल असल्याने तो मिळू शकला नाही. परंतु एका ठिकाणी हे संशयित थांबले होते. चारचाकी गाडी आणि दुचाकी गाडी होती. ते सीसी टीव्हीत कैद झाले आणि तो गुन्हा उघडकीस आला. तसेच शहरातील कारवांचीवाडी येथे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचा विनयभंग करणारा लंपट तरूण सीसी टीव्हीत आल्याने तो गुन्हा उघडकीस आला. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणातील महिला रेल्वेने गेल्याचे सीसी टीव्हीत कैद झाल्यानतंर त्यांना गोवा रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले, असे १७ गुन्हे सीसी टीव्हीमुळे उघड झाले आहेत.
--------------
खेडमध्ये मिशन नेत्रा ठप्पच..
जिल्ह्यातील एक संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खेडमध्ये प्रगतीआड गुन्हेगार व असामाजिक तत्व येऊ नये, या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून मिशन नेत्रा प्रायोगिक तत्वावर काही वर्षापूर्वी राबविण्यात आले होते. जिल्ह्यातील शहराच्या विस्तारामुळे वाहतूक वाढत आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुन्हेगारीला आळा घालणे, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण व जनजीवन सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
खेड शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने खेड शहर ‘नेत्रा’च्या कक्षेत आल्याने अप्रिय घटनाना पायबंद बसला होता. त्यामुळे समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी या नेत्रा मिशन साठी सामाजिक सलोख्याने हात पुढे करत शासनाच्या या योजनेला पाठबळ दिले. दुबई येथील उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. खेड मधील एका ठेकेदाराला ही यंत्रणा उभारण्याची व देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु अल्पावधीतच ही यंत्रणा डबघाईस आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लाखो रुपये खर्च करून देखील खेड शहर परिसरातील अनेक कॅमेरे बंद स्थितीत आहेत. बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीन बत्ती नाका याठिकाणी बसवण्यात आलेली लाऊड स्पीकर यंत्रणा देखील धुळखात पडलेली आहे. सुरवातीला या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दोन - तीन महिने चांगली व्यवस्था लावण्यात येत होती. एकाच ठिकाणी एक पोलीस कर्मचारी बसून वाहतूक देखील सुरळीत करण्यात पोलिस यंत्रणेला यश येत होते. पण काही महिन्यातच खेड येथे नेत्रा मिशन अंतर्गत बसविलेले कॅमेरे आणि लाऊड स्पिकर यंत्रणा ही धुळखात पडल्याचे दिसून येत आहे. या कॅमेऱ्यांच्या भवती पावसाळ्यात वेलींनी वेढा घातला आहे. तर अनेक ठिकाणी पावसात कॅमेरे भिजल्यामुळे बंद आहेत.
-----------------------
सीसीटीव्ही आणि गुन्ह्यांची उकलः गतवर्षाची आकडेवारी
खासगी सरकारी विभाग एकुण उघड गुन्हे
दापोली ४८ १० ५८ २
खेड ३२ ०९ ४१ ००
गुहागर ६८ १० ७८ ३
चिपळुण ७२० ११ ७३१ ४
राजापूर ९८ ६६ १६४ ००
मंडणगड १४० ५२ १९२ १
लांजा १०५ ४९ १५४ ००
देवरूख ३० १० ४० २
रत्नागिरी (ग्रामीण) ३८६ १०२ ४८८ १
रत्नागिरी (शहर) ८६ ३० ११६ १
संगमेश्वर ७१ २७ ९८ १
आलोरे ८ १७ २५ ००
सावर्डे ७२ ९ ८१ ००
बाणकेट ३७ ११ ४८ १
जयगड ३९४ १० ४०४ ००
नाटे १८६ ४९ २३५ ००
पूर्णगड ११२ १६ १२८ १
दाभोळ २९ ११ ४० ००
------------------------------------------------------------------------
एकूण २६२२ ४९९ ३१२१ १७
------------------------------------------------------------------
राजापुरातही सीसी टीव्हीचा वॉच अपूरा
पोलिस प्रशासनाच्या ‘नेत्रा’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारी अन् खासगी कार्यालये, बँका या ठिकाणी राजापूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये राजापूर तालुक्यामध्ये साठ ठिकाणी बसवलेल्या १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे; मात्र, गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या चोरी अन् घरफोडीच्या वाढत्या घटना पाहता सीसीटीव्ही कॅमेचा वॉच अपुरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या सुरक्षिततेचे कवच अधिक मजबूत करणे आणि त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सागरी महामार्ग, घाटमार्ग सिंधुदुर्ग जिल्हाप्रवेशद्वार मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथील पाचल फाटा, राजापूरचा एसटी डेपो परिसर, मोसम-केळवलीकडे जाणारा रस्ता, अणुस्कुरा घाटमार्ग येथे सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत.
५० टक्के गुन्हे उघडकीस येण्यास होतेय मदत
चिपळूण शहरातील चौकाचौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे रस्त्यावरील तसेच जवळपासच्या घटना, गुन्हे उघडकीस येण्यास सीसीटीव्हीचा महत्त्वाचा वाटा आहे. पोलिसांनी सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची सक्ती केली त्यामुळे सीसीटीव्हीची नजर असलेले चिपळूण हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. चिपळूण शहरात पूर्वी पोलिसांनी ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. ते कमी पडत असल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने ८६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्यामुळे एकूण ११८ ठिकाणी पोलिस सीसीटीव्ही कॅमेरांची नजर आहे. तालुक्याच्या सीमांवर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तालुक्यात ७३१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चिपळूण पालिकेनेही शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते येथील काही कॅमेरे बंद पडले. नारायण तलाव येथेही पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना पालिकेला केली आहे.
गुन्हे उकलण्यात अशी झाली मदत
शहरातील मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी, खून, फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचा पोलिसांना उपयोग होत आहे. ५० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यात आरोपीची ओळख पटविण्यात अथवा त्याचा माग काढण्यात या कॅमेऱ्यांचा उपयोग होत आहे. रोख पैशासाठी यापूर्वी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र एटीएम मशीन फोडणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानंतर पोलिस त्यांचा मार्ग काढत होते त्यामुळे मागील वर्षभरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रकार चिपळूणमध्ये झाला नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे सप्टेंबर २०२५ मध्ये बहादूरशेख नाका येथील खुनाचा छडा अवघ्या काही तासात लावण्यात चिपळूण पोलिसांना मोठे यश आले. बहादूरशेख नाका येथे राहणाऱ्या एका तरुणाची वडार कॉलनीतील दोघा तरुणांनी तलवारीने वार करून हत्या केली होती. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे संशयित आरोपींना अटक केली होती. धामणवणे येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा ऑगस्ट २०२५ मध्ये राहत्या घरात एकाने खून केला होता. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी जोशी यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयित आरोपीला सातारा येथून अटक केली.
कोट
जिल्ह्यात सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता रत्नागिरीत बसवल्यापैकी अनेक कॅमेरे कंपनीच्या दुर्लक्षामुळे नादुरूस्त आहेत. परंतु आम्ही कंपनीवर गुन्हा दाखल केल्यामुळे पुन्हा त्याची दुरूस्ती सुरू झाली आहे. चिपळूणमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चांगले जाळे आहे.
- बी. बी. महामुनी, अप्पर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी
कोट
सीसीटीव्हीमुळे ५० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात मदत होते. सीसीटीव्ही ही तांत्रिक मदत आहे. खबऱ्यांमुळे माणसाची माहिती, त्यांच्या वागणुकीत झालेले बदल व अन्य माहिती मिळते. दोघेही परस्पर पूरक आहेत. सीसीटीव्हीमुळे जे गुन्हे उघडकीस आले त्यातील मुद्देमालाची रिकवरी करून संबंधितांना परत ही देण्यात आले आहेत.
- फुलचंद मेगडे, पोलिस निरीक्षक, चिपळूण
कोट
खेड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सद्यस्थितीत बंदच असून पोलिस प्रशासन यंत्रणेची याकडे पूर्णपणे डोळेझाक झालेली दिसून येत आहे. या यंत्रणेमुळे शहरात होणाऱ्या चोऱ्या अपघात वाहतूक कोंडीवर एकाच ठिकाणी बसून नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते. त्यामुळे ही यंत्रणा सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे.
- सुरेंद्र तांबे, सामाजिक कार्यकर्ते, खेड
-------
कोट
सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापारी आणि व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, त्याच्या जोडीने अणुस्कूरा घाटमार्ग, सागरी महामार्गावरील धारतळे, मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी यांसह अन्य महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्याद्वारे सुरक्षिततेसह चोऱ्या, घरफोड्या, दरोडे यांचा उलगडा होण्यास निश्चितच मदत होईल.
- विवेक गुरव, व्यावसायिक