swt164.jpg
24914
कुडाळ ः शपथविधी सोहळ्यामध्ये बोलताना अंजली कुलथे. सोबत उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर, प्रा. कल्पना भंडारी, वैशाली ओटवणेकर, डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, डॉ. संजय निगुडकर व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
समर्पणातून समाजाचे आशीर्वाद घ्या
अंजली कुलथे ः कुडाळ नर्सिंग महाविद्यालयात शपथविधी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः माणूस जेव्हा दुसऱ्यासाठी काही करतो, तेव्हा त्यातला आत्मिक आनंद अवर्णनीय असतो. स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगा. त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा तुमच्या कठीण काळात उपयुक्त ठरतील. नर्सिंग क्षेत्रात अनेक आकस्मिक घटनांना सतत सामोरे जावे लागते. यावेळी समर्पण वृत्तीने सेवा देण्यास तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन अंजली कुलथे यांनी केले. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई येथील कामा हॉस्पिटलमधील २० गरोदर मातांसहित २० गर्भातील बालकांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिका अशी कुलथे यांची ओळख आहे.
श्रीमती कुलथे येथील बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या नूतन परिचारिका शपथ ग्रहण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा शपथग्रहण व ल्याम्प लाइटिंग सोहळा अतिशय दर्जेदार व दिमाखदार आहे. हा एक पवित्र क्षण आहे. याच्या रेखीव आयोजनाबद्दल संस्थाचालक उमेश गाळवणकर व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व त्यांच्या सर्व सहकारी स्टाफचे मी अभिनंदन करते. या क्षेत्रात धैर्य आणि समर्पण वृत्ती महत्त्वाची आहे. आपल्या समस्या विसरून रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करा."
उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंजली कुलथे यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. व्यासपीठावर सुंदर गाळवणकर, सौ. गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, उपप्राचार्य वैशाली ओटवणेकर, बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्रा. अरुण मर्गज, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी प्राचार्य प्रत्युषरंजन बिस्वाल, संस्था सल्लागार पल्लवी कामत, सायली वारंग आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ परिचारिकांच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्रास्ताविक प्रा. सुमन करंगळे-सावंत यांनी केले. प्रा. भंडारी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. अहवाल वाचन प्रा. वैशाली ओटवणेकर यांनी केले. प्रा. प्रणाली मयेकर यांनी सूत्रसंचालन केले.