कोकण

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणावरून संभ्रम

CD

24908

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच
अतिक्रमण व पुनर्वसनावरून गोंधळ ; नागरीक अस्वस्थ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ : कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे सध्या शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबाबत नियोजनातील अस्पष्टता, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन आणि कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.
आंबडवे-लोणंद या महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या दोन्ही टोकांवर वेगात सुरू असताना, भिंगळोली तहसील कार्यालय ते स्टेट बँक ऑफ इंडिया या मुख्य भागातील रस्ता अद्याप पूर्ववत असल्याने नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत असली, तरी पुढील आराखडा स्पष्ट नसल्याची भावना व्यक्त होत आहे. आंबडवे व लोणंद परिसरातील काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळते. महामार्ग मूळ नियोजनानुसार काँक्रिटीकृत व रुंद होणार का, याबाबत स्पष्टता नसल्याने मतभेदही वाढले आहेत. काही नागरिक अतिक्रमण हटवूनच रुंदीकरण व्हावे, अशी भूमिका घेत आहेत; तर व्यापारी व गाळेधारकांचे हित जपले जावे, अशी मागणी दुसऱ्या गटाकडून होत आहे. प्रशासनाकडून ठोस भूमिका जाहीर न झाल्याने संभ्रम कायम आहे.
दरम्यान, महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णवाहिका सेवांनाही वाहतुकीतील अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

-----
चौकट १

पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी पुनर्वसनाची प्रक्रिया मंद गतीने सुरू असल्याचे दिसते. नगरपंचायत पुनर्वसनास सकारात्मक असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात प्रयत्न अपुरे असल्याची टीका होत आहे. स्थानिक खासदार व आमदारांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

-----
चौकट २

दीर्घकालीन विकासाची संधी

नियमानुसार रुंदीकरण झाल्यास भविष्यातील वाहतूक ताण कमी होऊन व्यापार, पर्यटन आणि उद्योगांना चालना मिळू शकते. काँक्रिटीकृत रस्ता टिकाऊ ठरेल; मात्र अतिक्रमण हटविणे आणि पुनर्वसन हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. महामार्ग रुंदीकरण हा मंडणगडच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी प्रशासनाने जनभावना, व्यापाऱ्यांचे हित आणि नियमानुसार विकास यामध्ये संतुलन साधणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

----
कोट १
महामार्गाचे प्रस्तावित रुंदीकरण हे मंडणगड शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. खोकेधारकांनी नगरपंचायतीसोबत समन्वयाची भूमिका ठेवल्यास नगरपंचायत नक्कीच मार्ग काढू शकेल.
- वैभव कोकाटे, उपनगराध्यक्ष, मंडणगड.

-----
कोट २
नियमानुसार रुंदीकरण झाले तर पुढील २५-३० वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. मात्र, ठोस पुनर्वसन आराखडा जाहीर केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. धुळीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- रघुनाथ पोस्टुरे, सामाजिक कार्यकर्ते.

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT