कोकण

''ती, ती आणि ती'' नाटकाने उलगडले स्त्री जीवनाचे वास्तव

CD

rat१७p५.jpg-
नाटक
रत्नागिरीः बृहन्मुंबई महानगरपालिका, सहप्रमुख कामगार अधिकारी (शहर) या संस्थेने सादर केलेल्या ‘ती, ती आणि ती’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---
ती, ती आणि ती’ : स्त्री जीवनाचा आरसा
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सादरीकरण; अभिनयाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : स्त्री जीवनाचा व्यापक, वास्तववादी आणि विचारप्रवर्तक आरसा समाजासमोर ठेवणारे ‘ती, ती आणि ती’ हे नाटक रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात नुकतेच सादर झाले. लेख महेंद्र कुरघोडे यांच्या सशक्त संहितेने आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका, सहप्रमुख कामगार अधिकारी यांच्यावतीने या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध महिला दिग्दर्शक नम्रता काळसेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाटकात तीन वेगवेगळ्या स्तरांतील स्त्रियांच्या कथा गुंफण्यात आल्या आहेत. या कथांच्या माध्यमातून समाजाचे कटू वास्तव, महिलांचा दैनंदिन संघर्ष, पावलोपावली होणारा अपमान आणि जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले; मात्र, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘ती’ची न संपणारी जगण्याची जिद्द या नाटकाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली. नाटकातील संवादांनी आणि मांडणीने रत्नागिरीकर रसिकांना खिळवून ठेवले. प्रत्येक प्रसंगातील भावना आणि जिद्द कलाकारांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे पेलली. प्रयोगाच्या शेवटी रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणाऱ्या या नाटकाची चर्चा सध्या सांस्कृतिक वर्तुळात रंगली आहे.
---
‘ती, ती आणि ती’ हे नाटक तीन स्त्रियांच्या संघर्षाची आणि जाणिवेची गाथा आहे. शहराच्या गजबजाटात स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या तीन स्त्रियांची ही कथा आहे. मेधा, राणी आणि सगुणा या तिघींची परिस्थिती वेगळी, स्वप्ने वेगळी आणि जगण्याच्या वाटाही भिन्न; मात्र पितृसत्ताक समाजाने त्यांच्यासाठी आखलेली नियमावली मात्र एकच आहे.
मेधा ही सुशिक्षित, आत्मविश्वासू आणि स्त्रीहक्क चळवळीत सक्रिय असलेली कार्यकर्ती. अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे हेच तिचे जीवनध्येय; मात्र, ज्या आंदोलनात ती ‘स्त्री स्वातंत्र्याचा’ नारा देते तिथेच तिला राजकीय स्वार्थ आणि पुरुषी वर्चस्व अनुभवायला मिळतो. स्त्रीचा वापर केवळ एक साधन म्हणून केला जात असल्याची बोचरी जाणीव तिला होते. इतकेच नव्हे, तर प्रेमाच्या नात्यातही तिला फसवणूक पदरी पडते. बाह्यजगातील आदर्शवाद आणि वास्तवातील क्रूर दरी तिला अस्वस्थ करते.
दुसरीकडे राणी ही एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. संसार, नातेसंबंध आणि सामाजिक प्रतिष्ठा जपण्यात तिचे आयुष्य व्यतीत होते; मात्र, पतीच्या टोकाच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि संशयी स्वभावामुळे तिच्या चारित्र्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उभे केले जातात. संसार टिकवण्यासाठी ती अपमान गिळून तडजोड करते; पण जेव्हा मानसिक छळ असह्य होतो तेव्हा ती एका वळणावर येऊन उभी राहते. स्वतःच्या अस्तित्वासाठी जगायचे की, समाजाच्या चौकटीत संपून जायचे?
तिसरी आहे सगुणा. कष्टकरी, गरीब वर्गातील ही स्त्री घराचा गाडा ओढण्यासाठी जिवापाड कष्ट करते. पती अपघातात जखमी झाल्याने संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर येते. ‘नैतिकता’ आणि ‘प्रतिष्ठा’ या गोष्टी केवळ श्रीमंतांसाठी असतात, गरिबीसमोर त्या टिकत नाहीत, हे वास्तव तिने पचवले आहे. समाजाच्या अनास्थेचे चटके सोसूनही ती उभी आहे.
नाटकाचा परमोच्च बिंदू म्हणजे रेल्वेस्टेशनवर होणारी या तिघींची भेट. धावपळ, गर्दी आणि अनिश्चिततेच्या वातावरणात या तिन्ही कहाण्या एकमेकींना छेदतात. संवादातून त्यांना उमगते की, त्यांच्या समस्यांची रूपे वेगळी असली तरी त्यामागील मूळ कारण एकच आहे, पुरुषसत्ताक व्यवस्था आणि सामाजिक अन्याय.
एकमेकींच्या वेदना ऐकून त्यांना नवे बळ मिळते. आयुष्याने कितीही जखमा दिल्या तरी त्यातून सावरून पुढे जाण्याची ताकद स्वतःमध्येच आहे, याची जाणीव त्यांना होते. हे नाटक प्रेक्षकांना कोणतेही ठाम उत्तर देत नाही; पण एक बोचरा प्रश्न मागे सोडून जातो. ‘स्त्रीची वेदना ही केवळ वैयक्तिक असते की, सामाजिक?’
---
* सूत्रधार आणि सहाय्य
प्रकाशयोजना ः श्याम चव्हाण, नेपथ्य ः रजनीश कोंडविलकर, रंगभूषा ः उदयराज तांगडी, संगीत दिग्दर्शक ः अक्षय जाधव, वेशभूषा ः रजनीश कोंडविलकर.
----
* पात्र परिचय
सुभानराव ः नरेश कांबळे, माणिकराव ः संदेश कव्हाळे, मेघा ःडॉ. गायत्री आमोणकर, राकेश ः डॉ. कनक नागले, सुरेखा ः डॉ. मयुरा फुलपगार, मदन ः अमोल पाटील, राणी ः भावना रहाटे, पवन ः विनोद राणे, सगुणा ः मानसी जोशी, किसन ः तुषार चाळके, सुगंधा ः अर्चना डोळस.
----
* आजचे नाटक
नाटक ः झेंडा रोविला. सादरकर्ते ः बहुउद्देशीय संस्था, वेळ ः सकाळी ११.३० वा. नाटकः अग्नीपंख, सादरकर्ते ः समर्थ रंगभूमी रत्नागिरी, वेळ ः सायंकाळी ७.३० वा. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''ज्याची भीती होती तेच घडलं..'', ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचं मोठं विधान

Horoscope: उद्या बुधवार शुभ संयोग! मिथुन, सिंह आणि कुंभसह 'या' राशींसाठी १८ फेब्रुवारी ठरेल लाभदायक, तर काहींना सतर्क राहावे लागेल

Shiv Jayanti 2026: शिवजयंतीची सुट्टी मुलांसाठी करा खास! पुण्यातील 'या' संग्रहालयांना भेट देऊन इतिहास जिवंत अनुभवा

Nashik Shiv Jayanti : नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष, पण डीजेला 'नो एन्ट्री'; पोलिसांचा कडक बंदोबस्त सज्ज!

Online Gamingचा मुलांच्या मेंदूवर परिणाम? वेळेत ओळखा धोक्याची ‘ही’ 5 लक्षणे!

SCROLL FOR NEXT