- rat17p16.jpg-
26O25130
रत्नागिरी - नवोदिता-चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘तांडा’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
राज्य नाट्यस्पर्धा--------लोगो
‘तांडा’तून उलगडले अघोरी प्रथांचे दाहक वास्तव
नवोदित-चंद्रपूरचे सादरीकरण; रूढी, परंपरा अन् महिलांचा अभिनय रंगतदार
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : विसाव्या शतकातही रूढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रीचे होणारे शोषण आणि तिचे खुडलेले अस्तित्व आजही समाजापुढील एक गंभीर प्रश्न आहे. राजस्थानमधील एका विशिष्ट समाजातील लग्नावेळी केल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीसारख्या अघोरी प्रथेवर भाष्य करणारे ‘तांडा’ हे नाटक रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर झाले. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या या प्रयोगाने प्रेक्षकांना सुन्न केले.
नवोदित-चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या या नाटकाची संहिता निनाद पाठक यांनी लिहिली असून, प्रशांत कक्कड यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून हा प्रयोग आकाराला आला. ‘तांडा’ या नाटकातून राजस्थानमधील एका दुर्लक्षित परंपरेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लग्नाच्या रात्री स्त्रीच्या चारित्र्याची आणि कौमार्याची अग्निपरीक्षा घेतली जाते. या प्रक्रियेत स्त्रीच्या आत्मसन्मानाचा कशाप्रकारे चुराडा होतो, हे नाटकातून मांडले आहे.
चंद्रपूरच्या नवोदित कलाकारांनी आपल्या अभिनयाने तांड्यातील वेदना आणि विद्रोह समर्थपणे पेलला. नेपथ्य आणि पार्श्वसंगीताने नाटकातील गंभीर वातावरण अधिक गडद केले. प्रयोगाच्या शेवटी उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रथांविरूद्ध आवाज उठवणाऱ्या या नाटकाची चर्चा रत्नागिरीतील नाट्यप्रेमींमध्ये रंगली आहे.
-----
विज्ञानाच्या युगातही काही समाजांमध्ये रूढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रीचा कसा बळी दिला जातो, याचे विदारक चित्रण ‘तांडा’ या नाटकातून मांडण्यात आले आहे. राजस्थानमधील एका समाजातील ‘तांडा पंचायत’ आणि त्यांच्या अमानवीय कौमार्य चाचणीवर भाष्य करणाऱ्या या नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांना सुन्न केले. नाटकाची कथा एका विशिष्ट समाजातील ‘मोरा’ नावाच्या मुलीभोवती फिरते. त्या समाजाच्या परंपरेनुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीचे कौमार्य तपासले जाते. मोरा या अघोरी प्रथेला नकार देते तेव्हा तिची समाजात विटंबना केली जाते. पंचायतीचे म्होरके तिच्या तोंडाला काळे फासून धिंड काढतात, आई-वडिलांना मारहाण करून वाळीत टाकतात तर तिचा नवराही तिला सोडून जातो. मदतीसाठी पुढे आलेला ‘भैरू’ नावाचा पंचदेखील बदल्यात मोराच्या शरीराची मागणी करतो, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाटकातून प्रभावीपणे मांडली आहे.
या अन्यायाविरूद्ध शहरात वाढलेली, सुशिक्षित वकील शिवानी उभी राहते. शिवानीने स्वतःदेखील कौमार्याच्या मुद्द्यावरून आपल्या प्रियकराला नाकारलेले असते. ती मोराच्या गावी जाऊन एनजीओच्या मदतीने या प्रथेविरूद्ध न्यायालयात दाद मागते. न्यायालयात मोरा, तिचे वडील पांड्या आणि अशाच छळाला बळी पडलेल्या अनेक महिला साक्ष देतात. न्यायालय तांडा पंचायतीचा दंडुका मोडीत काढते. दिग्दर्शक प्रशांत कक्कड यांनी समाजातील संस्कृती, तेथील वेशभूषा आणि लोकजीवनाचा वापर करून नाटक चोहोबाजूंनी रंगतदार केले आहे. लेखक निनाद पाठक यांनी कौमार्याच्या मुद्द्यावरून होणाऱ्या स्त्रीशोषणावर अत्यंत टोकदार भाष्य केले आहे. प्रयोगाच्या शेवटी, परंपरेचा बुरखा फाडून सत्याचा विजय होताना पाहून रत्नागिरीकर रसिकही भारावून गेले.
-----------
* सूत्रधार आणि सहाय्य
निर्माता ः नवोदिता चंद्रपूर, प्रकाशयोजना ः मिथुन मित्रा, वेशभूषा ः मुग्धा खत्री, रंगभूषा ः सुशांत भांडारकर, संगीत ः वैभव पाराशर, संगीत सहाय्य ः राज बारसागडे, गीत ः प्रशांत मंडपुवार, पार्श्वसंवाद ः माधवी भट.
----
* पात्र परिचय
प्रशांत कक्कड, स्नेहल राऊत, कल्याणी बोरकर, गौरव भट्टी, अमृता दुधे-राहुड, शंकर लोडे, रोशन गजभिये, शिरीष आंबेकर, राजकुमार मुसणे, स्मृती राऊत, शुभदा कक्कड, चेतन धकाते, शीतल खोंडे, भिष्म सिंह, सोनू वानखेडे, अभिषेक श्रीकुंडावर, ओमप्रकाश गुंडावार, नरेश बोरीकर, सुलक्षणा गायकवाड, विलास मांडवकर, स्नेहल कोवळे, स्वरा गायकवाड, सागर जोगी, सुरेश गारघाटे, प्रिया लाडे, जितेश जोशी, साहिल खत्री, आरणा भांडारकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.