25215
संस्कृतीचे जतन हे प्रत्येकाचे कर्तव्य
पद्मश्री परशुराम गंगावणे ः गडमठ येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : रक्तदान सर्वश्रेष्ठ जीवदान समजले जाते. कोकण खूप समृद्ध आहे. येथील संस्कृती टिकवून कोकण अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जीवनात नेहमी मोठी स्वप्न बघून ते पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करा. प्रत्येक क्षेत्रात काम करताना दुसऱ्यासाठी सतत काम करत राहा, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांनी केले.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, एकदंत फूड अँड बेव्हरेजिस, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने (कै.) शीला शंतनू बांदिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच गडमठ गावठणवाडी येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच (कै.) शीला बांदिवडेकर यांच्या प्रतिमेला शंतनू बांदिवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
व्यासपीठावर वैभववाडी पंचायत समिती माजी सभापती बाप्पी मांजरेकर, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, गडमठ सरपंच मालती शेटे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय रासम, दंतरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील राणे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पोटे तसेच नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. करंबेळकर आदी उपस्थित होते. यावेळी (कै.) प्रभावती लक्ष्मण दवणे यांच्या स्मृतिपित्यर्थ लक्ष्मण दवणे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या सौजन्याने मानवाधिकार संरक्षण संघटना कोकण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने मानवाधिकार संघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.