rat१८p९.jpg-
२६O२५३७२
रत्नागिरी- समांतर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ-सांगली या संस्थेने सादर केलेल्या ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
राज्य नाट्यस्पर्धा-----------लोगो
नात्यातील अहंकार ः ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’
समांतर कला क्रीडा सांगलीचे सादरीकरण; रसिकांची अभिनयाला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : पतिपत्नीच्या नात्यातील ‘इगो’ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नसून, तो सामाजिक आणि वैचारिक पातळीवर किती गुंतागुंतीचा असू शकतो, याचे प्रभावी चित्रण ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकातून मांडण्यात आले आहे. राजन खान यांच्या ‘मनसुबा’ या कथेवर आधारित आणि डॉ. प्रमोद खाडीलकर यांनी नाट्यरूपांतरित केलेले हे नाटक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर झाले. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने ‘समांतर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सांगली’ने हे नाटक रंगमंचावर साकारले. समकालीन स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणारे ठरले. दिग्दर्शिका पायल पांडे यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली रंगलेले हे नाटक केवळ दोनच पात्रांच्या (स्त्री व पुरुष) बळावर पेलले गेले. या दोन्ही पात्रांच्या कसदार अभिनयाला रत्नागिरीकर रसिकांनी भरभरून दाद दिली.
-----
‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ हे नाटक पतिपत्नीच्या नात्यातील ‘इगो’ (अहंकार) आणि वैचारिक द्वंद्वाची प्रभावी मांडणी करते. वैयक्तिक स्वातंत्र्य, सामाजिक जबाबदारी आणि नात्यातील संघर्ष यांतून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे सूक्ष्म चित्रण या कथानकात पाहायला मिळते.
नाटकाची सुरुवात एका लग्नानंतरच्या गृहप्रवेशाने होते. लग्न करून घरी येताच पत्नी पतीवर प्रश्नांचा भडिमार करते. ‘तू माझ्याशी लग्न का केलंस? मी अनाथ आहे म्हणून की, दुसरी कोणी मिळाली नाही म्हणून?’ तिला सामाजिक कार्यात रस असतो आणि गावापासून दूर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असते. पती मात्र शांतपणे सांगतो की, ‘तू पहिल्या भेटीत आवडलीस म्हणून मी लग्न केले.’ येथूनच दोघांमधील वैचारिक संघर्षाला सुरुवात होते.
ती पत्नीची पारंपरिक भूमिका स्वीकारण्यास नकार देते. पती तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन संयम राखतो. सहा महिने उलटतात तरीही त्यांच्यात पतिपत्नी म्हणून नाते निर्माण होत नाही. या काळात ती स्त्रीमुक्ती संघटनेत सक्रिय होते आणि आपले शिक्षणही पूर्ण करते. कालांतराने दोघांमध्ये जवळीक निर्माण होते आणि ती गरोदर राहते; मात्र, ‘मला मूल नको, तू माझी फसवणूक केलीस,’ असे म्हणत ती गर्भपाताचा निर्णय घेते. पती तिला स्पष्टपणे सांगतो की, स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध काम करणाऱ्या तुझ्यासाठी हा निर्णयही एका प्रकारे भ्रूणहत्याच आहे. अखेर मुलाचा जन्म होतो आणि दोघेही त्याची जबाबदारी स्वीकारतात.
एक दिवस स्त्रीमुक्ती संघटनेच्या सभेसाठी ती लहान मुलाला पतीकडे सोडून चार दिवसांसाठी मुंबईला जाण्याचा हट्ट धरते. पतीचा विरोध असूनही ती निघून जाते; पण हे चार दिवस तब्बल २१ वर्षांच्या प्रदीर्घ विरहात बदलतात. २१ वर्षांनंतर ती पुन्हा घरी परतते तेव्हा नात्यात एक वेगळेच द्वंद्व उभे ठाकते. परतलेल्या पत्नीला पती स्पष्टपणे बजावतो, ‘तू इथे पाहुणी म्हणून आली आहेस, दोन दिवस राहा आणि निघून जा.’ ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, मुलाबद्दल विचारते. तेव्हा पती तिला जाणीव करून देतो की, ‘तो मुलगा आता मोठा झाला आहे. त्याच्यासाठी मीच बाप आणि मीच आई होतो. तो तुला प्रश्न विचारेल, कदाचित तुझा अपमानही करेल.’
जेव्हा ती विचारते की, ‘तुम्ही दुसरे लग्न का केले नाही?’ तेव्हा तो म्हणतो, ‘एक लग्न सांभाळता आले नाही तर दुसरे कशासाठी०?’ घटस्फोटाबाबत विचारल्यावर तो सांगतो की, ‘मुलगा मोठा झाल्यावर आता तुझी गरज उरलेली नाही.’ सरतेशेवटी, तो तिला निघून जाण्यास सांगतो आणि ती पुन्हा एकदा त्या घराचा उंबरठा ओलांडून कायमची निघून जाते. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि नातेसंबंधांतील ताणतणाव, त्यातून होणारी नात्यांची पडझड आणि त्याचे दूरगामी परिणाम हाच या नाटकाचा केंद्रबिंदू आहे.
----
* सूत्रधार आणि सहाय्य
प्रकाशयोजना ः आशिष भागवत, ओंकार मोटे, नेपथ्य ः सौरभ पांढरे, पार्श्वसंगीत ः महेश पवार, रंगभूषा ः अविनाश जोशी, सुनीता वर्मा, वेशभूषा ः अनिरूद्ध कुलकर्णी. रंगमंच सहाय्य ः सुशांत सावंत, प्रतीक साठे, सारंग भांबुरे, विजय सुतार, संतोष अबाळे, अमोद परांजपे, रोहित पवार. निर्मिती सहाय्य ः रमेश पाटील, ओंकार रोकडे,
--------
* पात्र परिचय
तो ः प्रताप सोनाळे, ती ः वैष्णवी जाधव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.